बापरे.. बँकेतून काढलेल्या ९ लाखांची रोकड लंपास
दांपत्याची पिशवी हिसकावून पसार, बँक ते घर केला पाठलाग
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. त्यातच अमळनेरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका दांपत्याकडून बँकेतून काढलेल्या ९ लाख रुपयांवर भामट्यांनी डल्ला मारला आहे. ही घटना अमळनेरातील भोईवाडा भागात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी बापू शिंगाणे हे त्यांची पत्नी सुरेखा यांच्यासह आयडीबीआय बँकेत सोमवारी दुचाकीने गेले होते. बँकेतून ९ लाख रुपये काढल्यानंतर त्यांनी ते पिशवीत ठेवले. पिशवी जवळ ठेवून ते घराकडे आले. घराजवळ दुचाकी थांबवली असता अचानक काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोन जण आले. त्यांनी रक्कम असलेली पिशवी हिसकावून घेत कसाली डीपी भागाकडे पसार झाले.
या दांपत्याने उसने पैसे परत करण्यासाठी व काही पैसे जवळ असावे म्हणून ही रक्कम बँकेतून काढली होती. बँकेपासून घरापर्यंत १५ मिनिटांत पोहचल्यांनतर चोरट्यांनी रक्कम लंपास करून पळ काढला. यावेळी लोकांनी या चोरट्यांचा पाठलागही केला. मात्र काही उपयोग झाला नाही.हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्याचा शोध सुरु आहे.