मुजोरी : तलाठ्यावर वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला
अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील घटना

अमळनेर I लोकशाही न्यूज नेटवर्क
अमळनेर तालुक्यातील मांडळ गावाजवळ अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गस्तीवर असलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांनी संध्याकाळी जीवघेणा हल्ला केला. तलाठ्यांना धक्काबुकी करून खाली ओढले, शिवीगाळ व धमकी दिल्या. यावेळी ट्रॉलीमधील चोरीची वाळू रस्त्यावर सोडत ट्रक्टर पळवण्यात आला. या घटनेमुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
२५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या तोंडी आदेशानुसार, मांडळ तालुक्यात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी ब्राम्हणे तलाठी विकेश भोई, शाहपुर तलाठी विक्रम कदम व इतर कर्मचारी गस्तीवर निघाले. स्वतःच्या मोटरसायकलवरून मांडळकडे जाताना जवखेडा गावाजवळ मांडळ रोडवर संध्याकाळी ५ वाजता निळ्या रंगाचा विनानंबर ट्रक्टर दिसला.
ट्रॉलीमध्ये भरपूर वाळू भरलेली असल्याने पथकाने ट्रक्टर थांबवला.चालकाला ओळखपत्र दाखवून वाळू वाहतुकीचा परवाना, ट्रक्टरची मालकी व नाव-गाव विचारले असता, त्याने परवाना नसल्याचे सांगितले. ट्रक्टर गोपाल बाळु पाटील (रा. सातरणे, ता. जि. धुळे) व अजय ईश्वर कोळी (रा. मांडळ, ता. अमळनेर) यांचे असल्याचेही कबूल केले. मात्र नाव व गाव सांगण्यास नकार दिला. शाहपुर तलाठी विक्रम कदम यांनी ट्रक्टर अमळनेर तहसील कार्यालयात नेण्याचे सांगितले तेव्हा गोपाल पाटील व अजय कोळी हे घटनास्थळी हजर झाले.
दोघांनी तलाठी विक्रम कदम यांना धक्काबुकी करून ट्रक्टरवरून खाली ओढले. तक्रारदाराने त्यांना चोरीची वाळू वाहतूक करत असल्याचे कायद्याचे स्पष्टीकरण दिले असता, त्यांनी शिवीगाळ करून “तुम्हाला आम्ही पाहून घेऊ” अशी धमकी दिली. ब्राम्हणे तलाठी विकेश भोई यांनी ट्रक्टरवर बसण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना धक्के देऊन शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. शेवटी गोपाल बाळु पाटील ट्रक्टरवर चढला आणि हायड्रॉलिक ट्रॉली उघडून वाळू रस्त्यावर पाडत अमळनेर दिशेने पळून गेला.
याप्रकरणी गोपाल बाळु पाटील व अजय ईश्वर कोळी यांच्यावर शासकीय कामात अडथळा, शिवीगाळ व धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे वाळू माफियांच्या वाढत्या कुरगुण्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


