भावाच्या निधनाने बहिणीचाही मृत्यू; तीन तासांत घडली दु:खद घटना

0

भावाच्या निधनाने बहिणीचाही मृत्यू; तीन तासांत घडली दु:खद घटना

अमळनेर : भावाच्या मृत्यूची बातमी समजताच बहिणीला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचेही निधन झाले. केवळ तीन तासांच्या अंतराने घडलेल्या या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, दोन्ही गावांमध्ये शोक व्यक्त होत आहे.

अमळनेरचे रहिवासी आणि धुळे-नंदुरबार ग. स. सोसायटीचे माजी व्यवस्थापक रमण सखाराम पाटील (वय ५९) हे पत्नीसह पुण्यात मुलीकडे गेले होते. रविवारी (२३ मार्च) सायंकाळी ५.३० वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

ही बातमी कळताच त्यांचे पार्थिव अमळनेरला आणण्याची तयारी सुरू झाली. दरम्यान, त्यांच्या बहिणी ललिता रावसाहेब काटे-पाटील (वय ५३, रा. कोळपिंप्री, ता. पारोळा) यांना हा धक्का सहन झाला नाही. त्या कोसळल्या आणि नातेवाइकांनी त्यांना अमळनेर येथील रुग्णालयात नेले, पण तीन तासांतच त्यांचाही मृत्यू झाला.

सोमवारी (२४ मार्च) सकाळी १० वाजता रमण पाटील यांच्यावर अमळनेर येथे अंत्यसंस्कार झाले. त्याच दिवशी दुपारी १ वाजता ललिता काटे-पाटील यांच्यावर कोळपिंप्रीत अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेने दोन्ही गावांवर दु:खाची छाया पसरली आहे.

रमण आणि ललिता यांच्यातील खास नाते गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबावर मोठे संकट आले असून, त्यांच्या प्रेमाची आठवण गावकऱ्यांच्या मनात कायम राहणार आहे, असे स्थानिक म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.