अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क
वावडे गावातील वीस वर्षीय तरुणाचा शेतात विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. ३१) दुपारी घडली आहे. गौरव दीपक माळी (वय २०) हा तरुण शेतात कामासाठी गेला असता फवारणी करताना विहिरीवर लावलेल्या मोटारच्या वायरचा स्पर्श त्याच्या मानेला झाल्याने त्याला विजेचा धक्का बसला.
दरम्यान त्याचे वडील व गावातील लोकांनी त्याला उपचारासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी भरत ईशी तपास करीत आहेत.
गौरव हा धुळे येथे ‘बीसीए’चे शिक्षण घेत असताना तो सुट्टीवर घरी आलेला होता. त्याचे आई-वडील हे शेतीकाम करतात. मुलाच्या निधनाने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनमिळावू स्वभावाच्या गौरवच्या अकस्मात निधनाने गावावरही शोककळा पसरली आहे.