भाजप अमित ठाकरेंचाच प्रचार करणार !
सदा सरवणकरांची डोकेदुखी वाढणार : मुख्यमंत्री शिंदेंपुढे पुन्हा पेच
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना शिंदे गटानेही येथून आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर, शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत अशी तिरंगी लढत रंगणार आहे. अशातच अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी शिंदेसेनेचा सहकारी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांची फौज एकवटली आहे. यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.
शिंदेसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा आणि अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा, अशी महायुतीतील अनेक नेत्यांनी उघड भूमिका मांडली आहे. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीतील दिलेल्या पाठिंब्याची शिंदेसेनेने परतफेड करावी, असे आवाहन केले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा, असे स्पष्ट केले. मात्र सदा सरवणकर कोणत्याही परिस्थितीत माघार घेण्यास तयार नाहीत. यातच आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ‘आम्ही अमित ठाकरेंचाच प्रचार करणार,’ या विधानामुळे महायुतीतीत अंतर्गत वातावरण तापण्याची शक्यता आहे.
सरवणकरांनी ठेवली अट
निवडणुकीतून माघार घेणार नाही, असे स्पष्ट भूमिका सदा सरवणकरांनी घेतली आहे. एकनाथ शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे.