जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या संदर्भात कथित ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद आता राज्याच्या राजकारणात अधिक तीव्रतेने उमटू लागले आहेत. या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, लेवा पाटीदार समाजाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
ऑडिओ क्लिपमधील कथित वक्तव्याच्या निषेधार्थ भोरगाव लेवा पाटीदार ठाणा पाडळसे विभागीय कार्यालयाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सकल लेवा पाटीदार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत अशा प्रकारच्या वक्तव्यांवर कठोर पावले उचलावीत, अशी भूमिका समाजबांधवांनी घेतली आहे.
कथित ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला लोकप्रतिनिधींबाबत अशा प्रकारचे वक्तव्य अस्वीकार्य असल्याचे सांगत विजय चौधरी यांच्यावर पक्षाने कठोर कारवाई करावी आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी काही पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे हा वाद केवळ विरोधी पक्षापुरता मर्यादित न राहता भाजपच्या अंतर्गत राजकारणातही चर्चेचा विषय ठरला आहे.
आमदार एकनाथ खडसे यांनी यापूर्वीच या कथित ऑडिओ क्लिपची माहिती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहचवणार असल्याचे स्पष्ट केले होते. संबंधितांविरोधात योग्य ती कारवाई व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे या प्रकरणात पक्षश्रेष्ठींची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले आहे. कथित ऑडिओ क्लिपमधील वक्तव्यामुळे भाजपमध्ये कार्यरत महिला लोकप्रतिनिधींच्या सन्मानाला धक्का बसल्याचा मुद्दा त्यांनी शाह यांच्यासमोर मांडला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, या संदर्भात अधिकृतपणे कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
दोन वर्षांचा आढावा सादर!
दरम्यान, रक्षा खडसे यांनी समाजमाध्यमांवरील एका पोस्टद्वारे अमित शाह यांच्या भेटीची माहिती दिली आहे. युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री म्हणून दोन वर्षांच्या सेवा-प्रवासाचा आढावा घेणारी पुस्तिका त्यांनी शाह यांना भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. एक कुशल मार्गदर्शक म्हणून त्यांचे मार्गदर्शन आणि उपस्थिती जनसेवेच्या मार्गावर नेहमीच नवी ऊर्जा देते, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. अमित शाह आणि रक्षा खडसे यांच्या भेटीनंतर या प्रकरणात पुढे कोणत्या घडामोडी घडतात, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.


