लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची घटना घडली. लडाखमध्ये शहीद झालेल्या एका जवानाचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की रुग्णवाहिकेचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेत असलेल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिकेत शहीद जवानाच्या मृतदेहासोबत त्यांचे नातेवाईक आणि चालक प्रवास करत होते. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. मात्र, तोपर्यंत रुग्णवाहिकेतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू करून मृतदेह बाहेर काढले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे.
शहीद जवानाचे पार्थिव लडाखहून विमानाने आणल्यानंतर पुढे त्याच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिकेने नेले जात होते. मात्र, वाटेतच हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. या घटनेमुळे शहीद जवानाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात अत्यंत शोकाकूल वातावरण पसरले आहे.
या भीषण अपघाताची दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांप्रती तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी स्थानिक प्रशासनाला घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगात करण्याचे आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत. उभा असलेला ट्रक कोणाचा होता आणि अपघात नेमका कसा घडला? याचा शोध घेतला जात आहे.

