लोकशाही न्यूज नेटवर्क
तुम्हालाही अमरनाथ यात्रेला जायचं असेल तर ही बातमी नक्की वाचा. देशभरातील भाविक आणि यात्रेकरूंचे श्रद्धास्थान असलेली अमरनाथ यात्रा ३ जुलै पासून सुरू होत आहे. यासाठी सोमवारपासून (दि.१४) नावनोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यावर्षी ही यात्रा जवळपास ५२ दिवस असणार आहे. ही यात्रा ३ जुलैपासून सुरू होईल आणि ९ ऑगस्टपर्यंत चालेल. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाविकांसाठी विशेष सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुरक्षा व्यवस्थाही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.
जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी ५ मार्च रोजी राजभवन येथे झालेल्या श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या ४८ व्या बैठकीत या वर्षीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. यावेळीही यात्रा अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम मार्ग आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गावरून एकाच वेळी सुरू होईल. प्रवाशांची अपेक्षित गर्दी लक्षात घेता, मंडळाने यावर्षी व्यवस्था आणि सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्याचे प्रस्ताव दिले आहेत. संपूर्ण भारतातील ५४० हून अधिक अधिकृत बँक शाखांमध्ये वेबसाइट किंवा ऑफलाइन नावनोंदणी सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यांना परवानगी नाही
यंदा ३ जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी १३ ते ७० वयोगटातील भाविक नोंदणी करू शकतात. ६ आठवडे किंवा त्याहून अधिक गर्भवती महिला, आजारी वयोवृद्ध भाविकांना यात्रेसाठी प्रवास करण्याची परवानगी नाही. यात्रेकरूंचा उत्साह आणि सरकारची तयारी पाहता, यावेळी अमरनाथ यात्रा आणखी भव्य आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे.
अद्वितीय शिवलिंग
गुहेत तयार होणार्या शिवलिंगाचे भाविकांना मोठे आकर्षण असते. या गुहेत शिवलिंगाबरोबरच दोन लहान बर्फाची पिंड तयार होते आणि त्यास पार्वती आणि श्री गणेश याचे प्रतीक मानले गेले आहे. गुहेच्या छताला असलेल्या एका भेगातून पडणार्या पाण्याच्या थेंबापासून शिवलिंग नैसर्गिक रूपाने तयार होते. अमरनाथ गुहेतील शिवलिंग हे चंद्राच्या प्रकाशाच्या आधारावर वाढते आणि कमी होते. अशा प्रकारचे जगातील एकमेव अद्वितीय शिवलिंग आहे. अमरनाथ यात्रेत भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून व्यापक तयारी केली जाणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.