अमळनेरात भरधाव चारचाकीची धडक

0

अमळनेरात भरधाव चारचाकीची धडक

दुचाकीस्वार गंभीर जखमी ; चालक फरार

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील गलवाडे रोड परिसरात रविवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भरधाव वेगात आलेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर वाहनचालक अपघाताची माहिती न देता पसार झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास गलवाडे रोडवरील स्वादिष्ट नमकीन दुकानासमोर हा अपघात घडला. एकनाथ राजधर पाटील (वय ५७, रा. रघुराजस नगर, शिरूड नाका, ता. अमळनेर, जि. जळगाव) हे आपल्या हिरो एचएफ डिलक्स दुचाकी (क्र. MH-13-CD-8367) वरून रस्ता ओलांडत असताना अमळनेरकडून येणाऱ्या मारुती सीएस कंपनीच्या चारचाकी वाहनाने (क्र. MH-18-BC-9207) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत एकनाथ पाटील हे दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डाव्या पायाला तसेच उजव्या कानाजवळ गंभीर दुखापत झाली असून ते बेशुद्ध अवस्थेत पडले होते. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना खासगी वाहनातून नर्मदा मेडिकल फाउंडेशन येथे उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

दरम्यान, अपघातानंतर चारचाकी वाहनाचा चालक जखमीस मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी दि. १४ डिसेंबर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, १३४(ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोहेकॉ विनोद भोई करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.