अमळनेर : शहरात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी अमळनेर पोलिसांनी मोठी कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषण (डम्प डेटा) यांचा आधार घेत तपास अधिक गतीमान केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे अरबाज शेख साजीद मनियार (वय २८, रा. धुळे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसी चौकशीत आरोपीने एका विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने अमळनेर व परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या दुचाकी धुळे शहरात लपवून ठेवल्याची माहिती त्याने दिल्यानंतर पोलिसांनी धुळ्यातून तीन दुचाकींचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अमळनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. पथकात पोउपनि शरद काकळीज, मिलींद सोनार, विनोद संदानशिव, निलेश मोरे, चंद्रकांत पाटील, विनोद सोनवणे, गौरव पाटील आणि मिलींद जाधव यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील आणि मिलींद सोनार करत आहेत.