वीज मिटर बदलण्यासाठी लाच; महावितरण अधिकारी जाळ्यात

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

महावितरणचा (Mahavitaran) तंत्रज्ञ आणि अभियंता यांनी वीज मिटर (Electricity meter) बदलण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (Anti Corruption Bureau) पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली आहे.

अमळनेर (Amalner) शहरात आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई करून महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली. याप्रकरणी तक्रार करणारे अमळनेर शहरातील रहिवासी आहेत. अमळनेर येथे स्वतःच्या मालकीच्या घरात घरगुती वापराचे विज कनेक्शन आहे. हे मिटर सुमारे पाच महिन्यांपासून बंद पडले असल्याने तक्रारदार यांना दरमहा सरासरी रकमेची बिल आकारणी होत होती. ते या बिलाची नियमित भरणा करीत होते.

१० दिवसांपुर्वी कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख, म.रा.वि. वि.क मर्या.अमळनेर शहरी विभाग कक्ष १ हे तकारदार यांच्या राहते घरी येवुन विज मिटरची पहाणी करून गेले होते. त्यानंतर याच कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ भरत पाटील हे तक्रारदाराच्या घरी गेले होते. याप्रसंगी त्यांनी वीज मिटर बदलण्यासाठी दहा हजार रूपये लागतील अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे धमकावले होते..

याप्रकरणी तक्रारदारांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Dhule Anti-Corruption Department) प्रत्यक्ष येवून लेखी तक्रार दिली होती. आज पडताळणी केली असता वरिष्ठ तंत्रज्ञ भरत पाटील यांनी स्वतःसह कनिष्ठ अभियंता देशमुख यांच्या करीता पाच हजार रूपयांची मागणी केली. या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने सापळा रचून वरिष्ठ तंत्रज्ञ भरत पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडुन पंचा समक्ष पाच हजार रूपयांची लाच घेतांना अटक केली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे तसेच पथकातील राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास वारेला, भुषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, प्रविण पाटील, मकरंद पाटील, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, प्रशांत बागुल यांनी केली आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.