‘तुम्हाला शनी आहे’ म्हणत मदारींनी लांबवली वृद्धाच्या हातातील अंगठी ; तीन जण अटकेत, एक फरार
अमळनेर | प्रतिनिधी
“तुम्हाला शनी आहे” असे सांगत हातचलाखीच्या जोरावर तिघा मदारींनी ८६ वर्षीय वृद्धाच्या हातातील तब्बल ५० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी लंपास केली. ही घटना १८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता अमळनेर बसस्थानकावर घडली. अवघ्या काही तासांत पोलिसांनी तपास चक्रे फिरवत तिघांना अटक केली असून, खाकीचा धाक बसताच आरोपींनी अंगठी परत दिली. मात्र, एक संशयित फरार झाला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील बळवंतराव जयवंतराव वाघ (वय ८६) हे आपल्या जावयाकडे, गांधली (ता. अमळनेर) येथे जाण्यासाठी बसस्थानकावर आले होते. जावयाने बाजार करून येतो तोवर वृद्ध बसस्थानकावर थांबले असताना तीन अनोळखी इसमांनी संवाद साधत फसवणुकीचा डाव रचला.
त्यातील एका इसमाने “शेगाव जाणारी बस किती वाजता आहे?” अशी विचारणा केली. वृद्धाने “कंट्रोल केबिनला विचारा” असे सांगितल्यावर दुसरा इसम आला आणि “माझ्या घरात सतत भांडणं होतात” असे सांगू लागला. त्यावर पहिल्याने म्हणाले, “तुला शनी आहे”. मग त्याने जमिनीवरचा खडा उचलून वृद्धाला म्हणाले, “हा बाबांच्या हातात ठेव”. वृद्धाने मूठ बंद करताच त्या इसमाने काही मंत्र पुटपुटत “रुद्राक्ष तयार झाला” असा भास निर्माण केला.
यानंतर त्यांनी “दक्षिणा द्या” असे सांगत हातचलाखीने वृद्धाच्या बोटातील सोन्याची अंगठी काढून घेतली. अंगठी २० रुपयांच्या नोटेत गुंडाळून “खिशात ठेवा, मागे वळू नका, शनी निघून जाईल” असे सांगून ते पसार झाले. वृद्ध काही अंतर गेल्यावर भानावर आले, तेव्हा अंगठी गायब असल्याचे लक्षात आले.
घटनेची माहिती बसस्थानकावरील पोलिस नाईक वाडिले यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना दिली. त्यांनी हेडकॉन्स्टेबल संतोष नागरे, प्रशांत पाटील, उज्वलकुमार म्हस्के, गणेश पाटील आणि नितीन कापडणे यांच्या पथकाला शोधमोहिमेसाठी पाठवले. तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांना चोरटे मोटरसायकलवरून पळाल्याची माहिती मिळाली.
पथकाने शिरपूर टोलनाका गाठून सापळा रचला आणि काही वेळातच संशयित मोटरसायकलसह आल्यावर त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींची नावे खुदबु नाजीर मदारी (३०, रा. लकडकोट, येवला), भैय्या आयुब मदारी (२७) आणि शाहरुख उर्फ शाहरुख हसन मदारी (२५, दोघे रा. नगरदेवळा, ता. पाचोरा) अशी उघड झाली. त्यांचा एक साथीदार मात्र फरार आहे.
पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींनी चोरीची अंगठी परत दिली. तसेच त्यांनी अशा प्रकारचे अनेक फसवणुकीचे प्रकार केल्याचेही कबूल केले आहे. तिघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३१८(४) व ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अमळनेर पोलिस करत आहेत.