अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ : शहर विकास आघाडीला स्पष्ट बहुमत

अमळनेर (प्रतिनिधी ) : अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मतदारांनी दिलेल्या कौलातून शहर विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले असून, नगरपरिषदेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र, अपक्ष उमेदवारांनीही प्रभावी कामगिरी करत काही प्रभागांमध्ये आश्चर्यकारक विजय नोंदवले, तर शिवसेनेने निवडक जागांवर यश मिळवले आहे. यामुळे सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट झाले असले तरी आगामी काळात गटबाजी व युतींचे राजकारण रंगणार असल्याची चर्चा आहे.
प्रभाग १ (अ) मध्ये शहर विकास आघाडीच्या कविता विजय राजपूत यांनी विजय मिळवला, तर (ब) मध्ये अपक्ष कैलास नामदेव पाटील यांनी बाजी मारली. या प्रभागात निकाल शेवटच्या फेरीपर्यंत रंगतदार राहिला. प्रभाग २ मध्ये आघाडीने दोन्ही जागा पटकावल्या. (अ) मधून देवेंद्र भानुदास कांबळे आणि (ब) मधून अफसाना मुक्तार खाटीक यांनी विजय संपादन केला. प्रभाग ३ मध्येही आघाडीचा दबदबा कायम राहिला. (अ) शोभाबाई भिवसन गढरी आणि (ब) भरतकुमार सुरेश ललवाणी यांनी आघाडीचे संख्याबळ वाढवले. प्रभाग ४ (अ) मध्ये शहर विकास आघाडीच्या नंदा नरेंद्र संदानशिव विजयी झाल्या, तर (ब) मध्ये शिवसेनेचे शेख नाविद अहमद मुशिरोद्दीन यांनी आघाडीला धक्का देत जागा पटकावली. प्रभाग ५ (अ) मध्ये शिवसेनेचे श्रीराम भगवान चौधरी तर (ब) मध्ये अपक्ष कल्पना परदेशी यांनी यश मिळवले. प्रभाग ६ मध्ये अपक्षांचा बोलबाला राहिला; (अ) सविता योगराज संदानशिव आणि (ब) दीपक हरी चौगुले विजयी झाले.
प्रभाग ७ (अ) योगिता संयाजीराव कापडणे, (ब) प्रवीण गंगाराम पाटील; प्रभाग ८ (ब) अपूर्वा जालंदर चौधरी; प्रभाग ९ (अ) मुन्ना शर्मा, (ब) पंकज चौधरी; प्रभाग १० मध्ये सुवर्णा चौधरी व विजय पाटील; प्रभाग ११ (ब) विजय कहारू पाटील आणि प्रभाग १२ (अ) पुष्पा पंकज भोई, (ब) सुयोग ज्ञानेश्वर धनगर यांनी विजय मिळवला. या निकालांमुळे शहर विकास आघाडीला नगरपरिषदेत स्पष्ट बहुमत मिळाले असून, सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, अपक्षांची मजबूत उपस्थिती आणि शिवसेनेचे काही प्रभागांतील यश यामुळे निर्णयप्रक्रियेत विविधता येण्याची शक्यता आहे. शहराच्या विकास कामांना यामुळे नवीन गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

