वाळू माफियांचा महसूल पथकावर हल्ला

0

वाळू माफियांचा महसूल पथकावर हल्ला

अवैध वाळू उपशावर कारवाई दरम्यान धक्कादायक प्रकार

अमळनेर तालुका प्रतिनिधी : मांडळ शिवारातील पांझरा नदीपात्रात अवैध वाळू उपसा थांबविण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळूमाफियांनी मध्यरात्री जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी (७ डिसेंबर) उघडकीस आली. आरोपींनी महसूल कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांवर स्प्रे मारून त्यांना जखमी केले, तसेच गावठी पिस्तूलाचा धाक दाखवून जीव घेण्याची धमकी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंडळाधिकारी पुरुषोत्तम शिवाजी पाटील (वय ३६) आणि सहकारी जितेंद्र दिलीप पाटील हे मध्यरात्री गस्त घालत नदीपात्रात पोहोचले असता, दोन ट्रॅक्टरमध्ये जेसीबीने वाळू भरण्याचे काम सुरू असल्याचे दिसले. चौकशी केल्यानंतर अचानक १० ते १२ अनोळखी व्यक्ती लाठ्या-काठ्यांसह घटनास्थळी धावून आले.

माफियांनी जितेंद्र पाटील यांच्या डोळ्यांवर स्प्रे मारून जखमी केले, तर मंडळाधिकारी पाटील यांच्या कपाळावर गावठी पिस्तूल लावून “येथून निघालात नाही तर जीवे ठार करीन” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर आरोपी ट्रॅक्टर, जेसीबी आणि दुचाकी घेऊन पसार झाले.

या घटनेनंतर मंडळाधिकारी पाटील यांनी मारवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी वाळूमाफियांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.