अलवाडी येथे दारूबंदी पथकाचा छापा; सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
चाळीसगाव : तालुक्यातील अलवाडी येथील तिरमल्ली वस्तीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारूबंदी पथकाने छापा टाकून सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत गौतम लक्ष्मण गरूड (वय ३३) याला अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जळगाव जिल्हा अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक अशोक तारू व चाळीसगावचे निरीक्षक किशोर गायकवाड यांनी ही कारवाई केली. छाप्यादरम्यान गरूड याच्या घरातून विविध बँडच्या गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या, बनावट लेबल्स व बुच असा एकूण २ लाख २५ हजार १६६ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
या प्रकरणी गौतम गरूड याच्याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई निरीक्षक अशोक तारू, किशोर गायकवाड यांच्यासह दुय्यम निरीक्षक वाय. वाय. सूर्यवंशी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एन. व्ही. पाटील तसेच पथकातील आर. टी. सोनवणे, एन. बी. पवार, आर. पी. सोनवणे, व्ही. टी. हटकर, पी. एस. पाटील व व्ही. बी. परदेशी यांनी केली.

