लोकशाही संपादकीय लेख
दिवाळी सणाचे फटाके फोडून सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना महाराष्ट्रात महायुती सरकारमधील घटक पक्ष भाजप, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अनेक ठिकाणी स्वबळाची घोषणा होत असल्याने, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीत फूट पडलेली असेल, हे चित्र आताच स्पष्ट झाले आहेत. महायुतीतील फुटीच्या आणि स्वबळावर निवडणुका लढविण्याच्या संदर्भातील महाराष्ट्रात पहिला मान पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडे जातो. पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी हा स्वबळाचा आणि एकला चलो रे नारा दिला. महाराष्ट्रात भाजप शिवसेनेची जरी युती झाली तरी माझ्या पाचोरा भडगाव मतदार संघात शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविणार आहे, असे घोषित करून आमदार किशोर पाटील यांनी भडगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची घोषणा देखील केली.
भडगाव नगर परिषदेसाठी अनुसूचित जाती महिला राखीव असल्याने किशोर पाटलांनी रेखा मालचे या महिला उमेदवाराची घोषणा केली. पाचोरा नगरपालिका अध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराची घोषणा येत्या एक नोव्हेंबरला आप्पाच्या वाढदिवशी करण्यात येणार आहे. म्हणजे निवडणुका जाहीर होतील तेव्हा होतील, पण पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भात बोलताना भाजपचे चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे की, पाचोरा भडगाव मतदार संघात आमदार किशोर पाटील यांनी शिवसेना स्वबळावर लढवण्याची घोषणा केली असली, तरी भाजप सुद्धा सर्वात मोठा पक्ष आहे. तो सुद्धा स्वबळावर निवडणूक लढवेल. भाजपचे पाचोरा पंचायत समितीचे सभापती म्हणून मधु पाटील यांनी उत्तम कार्य केले आहे.
भडगाव पाचोरा नगरपालिका मध्ये भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल. राजकारणात कुणी कुणाचा कायम शत्रू अथवा कायमचा मित्र नसतो. त्यामुळे पाचोर्याचे शिवसेना आमदारांच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेला चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सुद्धा भाजप स्वबळावर लढेल असे प्रत्युत्तर देऊन घोषणा केली आहे. त्यामुळे स्वबळाची तयारी आतापासूनच शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे आणि बंधू राज ठाकरे यांची युती झाल्याने त्यांची सुद्धा स्वबळावर लढण्याची घोषणा होईलच. म्हणजे आताच पाचोरा भडगाव मतदार संघात पक्षांच्या तिरंगी लढती होतील असे चित्र आहे..
31 जानेवारी 2024 च्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश महायुती सरकारला दिले असले तरी आधी मतदार यादी सुधारणा करून मगच निवडणुका घ्या असा आग्रह विरोधी पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे केली आहे. चार वर्षे निवडणुका घेतल्या नाहीत. आता यादीत सुधारणा करण्यासाठी चार ते सहा महिने निवडणुका पुढे गेल्या तरी चालतील पण दर्जेदार मतदार यादी तयार करून मगच निवडणुका घेण्याचा आग्रह केल्याने निवडणुका वेळेवर होतील की नाही, हा एक पेच निर्माण झाला आहे. आणि हा फार मोठा गंभीर प्रश्न देखील आहे. जसे पाचोरा भडगाव तालुक्यात शिवसेना-भाजपतर्फे स्वबळाची घोषणा केली, तत्वतच ठाणे महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपने स्वबळाची घोषणा केली आहे. अबकी बार सत्तर के पार अशी घोषणा ठाणे महानगरपालिकेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. त्याला उत्तर म्हणून भाजप तर्फे ठाण्यात स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.
अभी नही तो कभी नही…, चप्पा चप्पा भाजपा… अशा घोषणा भाजपचे कार्यकर्ते प्रशिक्षण शिबिरात ठाण्यामध्ये देण्यात आल्या. म्हणजे युतीतील विदुष्ट विकोपाला गेले असल्याचे स्पष्ट होते आहे. त्याआधी सुद्धा मंत्री गणेशा नाईक यांनी ठाण्यामध्ये जाऊन जनसभा घेताना त्यावरून वाद सुरू आहे. शिवसेनेच्या गद्दारांना नवी मुंबई महापालिकेत स्थान देणार नाही, अशी घोषणा करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. तिकडे पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध चिंचवड महानगरपालिकेत भाजप तर्फे दंड थोपटले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निमित्तावरून फुटीला सुरुवात झाली आहे.