समाजातील सर्वच घटकांनी एकत्र असावे!
महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांचे प्रतिपादन : केशव स्मृती समूहातर्फे सत्कार
जळगाव : आपण सर्वच समाजाचे घटक आहोत. प्रत्येक व्यक्ती समाजाचे देणे लागतो. सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, असे प्रतिपादन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी येथे केले.
शहरातील नवी पेठेतील जळगाव जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात केशव स्मृती सेवा समूहातर्फे त्यांचा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. शाल, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर केशवस्मृती सेवा समूहाचे प्रमुख डॉ. भरत अमळकर, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने उपस्थित होते.
श्री. कराळे म्हणाले की, जनता बँकेतर्फे करण्यात आलेला सत्कार हा सुखद धक्का देणारा आहे. अशा प्रकारच्या सत्काराची अपेक्षा नव्हती. जळगावात सेवेत असताना स्व. अविनाश आचार्य यांच्या कार्याबद्दल बरेच काही ऐकले आहे. त्यांच्याबद्दल विशेषत: मुस्लीम महिला आणि बांधवांमध्येही आदराची भावना होती. अशा व्यक्तिमत्त्वाला सलाम आणि त्यांनीच स्थापन केलेल्या संस्थेतर्फे आज सत्कार होतोय याचा विशेष आनंद आहे. मी कवी, खेळाडूवृत्तीचा आहे. मी समाजात सहज मिसळतो, अशा उपक्रमात सहभागी होतो. काही जण याचे कौतुक करतात, तर काही वेळा टीका होते. पोलिसांचे हे काम आहे का? असेही बोलले जाते. पण अशा लोकांना माझे स्पष्ट सांगणे आहे, ज्या समाजात क्रीडा, साहित्य, कला, आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्या ठिकाणी शांतता कायम राहते. यामुळे आमच्या खात्याचे काम कमी होते. माझ्या मते हे उपक्रम अनपेक्षित घटना रोखण्यासाठीचे लसीकरण आहे. त्यामुळे सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी असे केले पाहिजे. शासन, प्रशासन आणि नागरिक आपण सर्व एक आहोत. आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, असे म्हणत त्यांनी केशवस्मृती सेवा संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.
प्रास्ताविक समग्र कृषी व ग्रामीण विकास प्रकल्पप्रमुख अनिल भोकरे यांनी केले. मानपत्र वाचन किरण सोहळे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप लाड यांनी केले. कार्यक्रमास केशवस्मृती सेवा संस्था समूह, जळगाव जनता सहकारी बँक संचालक व समूहातील मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रसंगी कराळे यांनी स्वरचित कविता वाचून दाखविली. कवितेस उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
संस्कार रुजविणारी संस्था
केशवस्मृती संस्थेचे उपाध्यक्ष निळकंठ गायकवाड यांनी जो व्यक्ती कीत मागे पळतो, त्याच्यापासून कीत लांब पळते. काही माणसे कीतपासून लांब पळतात, अशा माणसांच्या मागे अस्पष्टपणे सावलीसारखी कीत मागे मागे जात असते. माणूस हा त्याच्या कर्तृत्वाने चमकतो, असे म्हणत दत्तात्रय कराळे यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. संस्थेच्या विवेकानंद शाळेचे उदाहरण देत आमची शाळा संस्कार रुजविते, असे गायकवाड यांनी नमूद केले.
वर्दीतील सहृदय माणूस : डॉ. अमळकर
केशवस्मृती सेवा समूहाचे प्रमुख डॉ. भरत अमळकर म्हणाले, आम्ही सन 2009 ला अखिल भारतील अधिवेशन घेतले. या कार्यक्रमाला गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आले होते आणि त्यांचा परिचय आणि प्रस्तावना करण्याची संधी मला मिळाली होती. त्यांच्या परिचयात मी असे म्हटले होते की, ‘आज मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री आहेत, ते पुढे देशाचे पंतप्रधान होतील आणि जगाचे नेतृत्व करतील.’ तेव्हा मी असे का बोललो माहीत नाही पण… तसेच घडले. असाच प्रकार एकदा झाला. आपण दरवर्षी अविनाशजी आचार्य पुरस्कार देतो. आपण बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला पुरस्कार वितरणासाठी बोलावतो. पण, या पुरस्कार वितरणाला आपण त्या वेळचे पोलीस अधीक्षक दत्ताजी कराळे यांना बोलावू असे ठरले. यावर एकाने विचारले की, सामान्यतः आपण पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी अशा स्थानिक लोकांना बोलवत नाही. पण, मी म्हणालो, ‘ते उद्या मोठे होणारच आहेत आणि ते त्यांच्या कर्तृत्वाने सिद्ध झाले.’ हा साक्षात अनुभव आहे.