अरे देवा .. : पृथ्वीवर होईल एलियनचा हल्ला ; हार्वर्डच्या शास्त्रज्ञाचा खळबळजनक दावा
वॉशिंग्टन (वृत्तसंस्था): पृथ्वीवर लवकरच एलियनचा हल्ला होऊ शकतो, असा खळबळजनक दावा हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ प्रोफेसर एव्ही लोएब यांनी केला आहे. त्यांनी चेतावणी दिली आहे की २९ ऑक्टोबरपूर्वीच लोकांनी सुट्ट्या घ्याव्यात, कारण त्यानंतर काय घडेल हे कोणीही सांगू शकत नाही.
‘डेली स्टार’च्या वृत्तानुसार, जुलै महिन्यापासून मॅनहॅटनच्या आकाराच्या एका गूढ वस्तूवर अंतराळ संशोधकांचे लक्ष केंद्रित झाले आहे. ही वस्तू अत्यंत वेगाने फिरत असून ती एलियन तंत्रज्ञानाची जहाजासारखी (Alien Ship) असू शकते, असा लोएब यांचा अंदाज आहे.
या गूढ वस्तूला “3/ATLAS” असे नाव देण्यात आले असून ती १ जुलै रोजी प्रथमच दिसली होती. बहुतेक शास्त्रज्ञ तिला धूमकेतू मानत असले तरी प्रो. लोएब यांच्या मते ही इंटरस्टेलर (Interstellar) वस्तू म्हणजे एलियनचे अंतराळयान असू शकते, जे मानवजातीला “वाचवण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी” येत आहे.
लोएब यांच्या मते, ही वस्तू २९ ऑक्टोबर रोजी सूर्याच्या सर्वाधिक जवळ पोहोचेल, आणि त्या वेळेस पृथ्वीवर अचानक हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यांनी लोकांना सुट्टी घ्यावी आणि जीवनाचा आनंद घ्यावा, असा सल्ला देत म्हटले “यानंतर काय होईल, हे कुणालाही ठाऊक नाही.”
शास्त्रज्ञांच्या गणनानुसार, हे अंतराळयान २१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान पृथ्वीच्या जवळून जाण्याची शक्यता आहे.ही वस्तू सुमारे ३३ अब्ज टन वजनाची असून मागील कोणत्याही ताऱ्यांमधून जाणाऱ्या वस्तूंपेक्षा दुप्पट वेगाने फिरत आहे. तिच्यातून दर सेकंदाला चार ग्रॅम निकेल बाहेर पडत असल्याचे आढळले आहे.
लोएब यांच्या म्हणण्यानुसार, या पदार्थात निकेल टेट्राकार्बोनिल नावाची मानवनिर्मित मिश्रधातू सापडली आहे, जी नैसर्गिक स्वरूपात कधीही धूमकेतूमध्ये पाहिली गेली नव्हती. त्यामुळे त्यांनी असा निष्कर्ष काढला की ही वस्तू नैसर्गिक नसून कृत्रिम—कदाचित एलियननी तयार केलेली असू शकते.
लोएब यांनी ‘न्यू यॉर्क पोस्ट’ला सांगितले “या घटनेचे परिणाम आपण फक्त कल्पना करू शकतो.जर ही वस्तू खरोखर एलियन जहाज असेल, तर ते पृथ्वीच्या भविष्यासाठी निर्णायक ठरू शकते.” या दाव्यामुळे वैज्ञानिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही संशोधकांनी मात्र हा दावा “कल्पनारम्य आणि अतिरंजित” असल्याचे सांगत एलियन हल्ल्याची शक्यता फेटाळली आहे.