हतनूर धरणाचे आठ दरवाजे उघडले : तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु
जळगाव – हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी धरणातून तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या हतनूर धरणाचे 41 पैकी 4 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून 32 दरवाजे दोन मीटरने उघडे ठेवण्यात आले आहेत. धरणातून सध्या 1 लाख 85 हजार 828 क्यूसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाण्याची आवक कायम राहिल्यास पुढील काही तासांत विसर्ग 3 लाख 50 हजार ते 3 लाख 75 हजार क्यूसेकपर्यंत वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तिरावरील गावांमधील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने नागरिकांना विनाकारण नदीपात्रात किंवा नदीकाठी जाऊ नये, पूरग्रस्त भागात प्रवेश टाळावा, जनावरे व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग तसेच जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या वतीने हा सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.


