लोकशाही संपादकीय लेख
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निकाल काल जाहीर झाला. जळगाव जिल्ह्यात सर्वात प्रतिष्ठेच्या बनलेल्या भुसावळ नगरपालिकेत नगराध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढाईत मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गायत्री भंगाळे यांनी 1856 मतांनी पराभव केला. स्वतःच्या होम पिचवर पत्नीचा पराभव होणे म्हणजे सावकारेंना मोठा धक्का म्हणावा लागेल. एकूण 50 नगरसेवक असलेल्या भुसावळ नगरपालिका निवडणुकीत भाजपाला 27 जागांवर विजय मिळाला असला तरी राष्ट्रवादीने 12 तर शिवसेना दोन, काँग्रेस तीन, अपक्ष चार असे उमेदवार विजयी झाले आहेत. नगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक भाजपचे निवडून आले असले तरी ‘गड आला पण सिंह गेला’ असे म्हणता येईल. भुसावळ नगर परिषद निवडणुकीत पैशांचा प्रचंड वापर झाला. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री भुसावळ प्रचाराला येऊन गेले. स्वतः मंत्री सावकारे दस्तूर खुद्द संपूर्ण प्रचारात होते. तरीसुद्धा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सावकारेंना पराभव पत्करावा लागला. भुसावळ विधानसभा मतदारसंघातील वरणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा नगराध्यक्षपदाच्या भाजप पक्षाच्या उमेदवाराचा भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दारुण पराभव केला. सुनील काळे यांचे भाजपचे तिकीट कापण्यात मंत्री संजय सावकारे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा वाटा असल्याने या दोन्ही मंत्र्यांच्या नाकावर टिच्चून सुनील काळे यांनी विजय प्राप्त केला. तसेच सावकारे व रक्षा खडसे यांची नावे न घेता पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणविणाऱ्यांना निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचा केसाने गळा कापला असा, आरोप विजयानंतर प्रतिक्रिया देताना व्यक्त करून आगामी भविष्यात आता आम्ही त्यांना धडा शिकवू असे सूचक वक्तव्य देखील काळे यांनी केले आणि समर्थकांच्या टाळ्या घेतल्या. त्यामुळे भुसावळ या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नगरपालिकेतील रजनी सावकार यांचा पराभव आणि वरणगाव नगरपालिकेत भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार सुनील काळे यांनी भाजप उमेदवाराचा केलेला पराभव, हा वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना चांगलाच भोवणार आहे. सावकारे यांना आगामी राजकारणासाठी ही धोक्याचीच घंटा म्हणता येईल. त्यातच मुक्ताईनगर पालिकेत भाजपचा झालेला दारूण पराभव केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना धक्कादायक ठरला आहे. मुक्ताईनगरचा पराभव भाजपसाठी मोठा पराभव आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी हे कबूल केले आणि त्या पराभवाचे खापर एकनाथ खडसेंवर फोडले आहे. एकंदरीत राज्याचे नगरपालिकेला निवडणूक प्रभारी म्हणून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचीच म्हणावी लागेल.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मतदारसंघातील भुसावळ आणि वरणगाव नगरपालिकेच्या निवडणूक पराभवाच्या कारणांचे विश्लेषण केले तर भुसावळ विधानसभा मतदारसंघातील विकासाचा बॅकलॉग त्याला कारणीभूत आहे. 2009 पासून ते 2024 असे चार वेळा भुसावळ विधानसभा राखीव मतदार संघात आमदार म्हणून संजय सावकारे निवडून येत आहेत. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आणि अडीच वर्ष त्यांना मंत्रिपद ही मिळाले. त्यानंतर 2014 पासून सलग तीन वेळा निवडून आले आणि सध्या ते वस्त्रोद्योग कॅबिनेट मंत्री आहेत. चार टर्मच्या कालावधीत भुसावळ शहरात मतदार संघाचा विकासाने कायापालट व्हायला हवा होता. परंतु गेल्या पंधरा-सोळा वर्षात एकही विकासाचा मोठा प्रकल्प मतदार संघात आलेला नाही. उलट भुसावळकरांना सात ते आठ दिवसांनी नळाला अशुद्ध पाणी मिळते. तापी नदी भुसावळ जवळून वाहत असताना साधे पिण्याचे पाणी नियमित भुसावळकरांना मिळत नाही. रेल्वेचे मोठे जंक्शन असताना तसेच महामार्गावर भुसावळ असताना एमआयडीसी डेव्हलप होऊ शकली नाही. त्या उलट भुसावळचे सामाजिक स्वास्थ्य मात्र दिवसेंदिवस बिघडत आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात सावकारे अपयशी ठरले आहेत. आधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भाजप या पक्षाच्या माध्यमातून विधानसभेची राखीव जागेमुळे निवडून येणारे संजय सावकारे यांनी भुसावळसाठी काय दिले? असा प्रश्न या निवडणूक पराभवाच्या निमित्ताने जनता प्रतिक्रिया व्यक्त करते आहे. भुसावळ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील जातीवादही उफाळून आल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गायत्री भंगाळे यांच्या विजयी मिरवणुकीत हातात वांगी घेऊन विजयी मिरवणूक काढण्यात आली, हे कशाचे द्योतक आहे. जळगाव नगरपालिका निवडणुकीच्या आधी नगराध्यक्षपदाचे जे राखीव आरक्षण जाहीर झाले, तेव्हापासून भुसावळकरांनी आपला रोष व्यक्त केला होता. मंत्री संजय सावकारे यांनी या राखीव आरक्षणातून स्वतःच्या पत्नीच्या निवडीची सोय केली, असे निवडणुकी आधीच बोलले जात होते. तसेच जिल्हा परिषदेच्या तिन्ही जागांचे आरक्षण राखीव, पंचायत समिती सभापतीपद राखीव जाहीर झाल्याने भुसावळ विधानसभा मतदार संघातील जनता चिडली होती. त्याचा परिणाम भुसावळ आणि वरणगाव नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी दाखवून दिला. त्यासाठी संजय सावकारे यांनी ही धोक्याची घंटा ओळखली पाहिजे. विकास कामांच्या जोरावर अपक्ष उमेदवार सुद्धा विजयी होऊ शकतो, हे वरणगावच्या सुनील काळे यांनी दाखवून दिले आहे…!

