लोकशाही संपादकीय लेख
ठाणे जिल्ह्यात बदलापूर येथे नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस स्वरक्षणार्थ गोळीबारात मृत्यू झाला. रिमांड घेण्यासाठी नेत असताना आरोपी अक्षय शिंदेने पोलीस व्हॅन मध्ये पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर हल्ला केला. नंतर फौजदाराच्या पायाला गोळी चाटून गेली. त्यामुळे स्वरक्षणार्थ पोलिसांनी पोलीस व्हॅनमध्येच अक्षय शिंदेला एकच गोळी डोक्यात नेम धरून झाडली आणि त्यात अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले तेव्हा त्याला मृत घोषित करण्यात आले.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची ‘पोलिसांनी रचलेली ही स्टोरी’ हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. पोलीस व्हॅनमध्ये सात ते आठ पोलीस असताना हातात बेड्या असलेल्या आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांशी झटापट करून त्यांच्या कमरेची बंदूक काढून, त्या बंदुकीतून तीन गोळ्या पोलिसांवर झाडल्या, असे पोलीस व्हॅनमध्ये असलेल्या पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या कमरेची बंदूक अक्षय शिंदेने हिसकावून घेतली, हे पोलिसांचे म्हणणे मुळात संशयास्पद वाटते. तसेच तीन फैरी झाडेपर्यंत व्हॅनमधील पोलीस हात बांधून बघत बसले होते का? त्यानंतर पोलीस म्हणतात, ‘स्वरक्षणार्थ पोलिसांनी अक्षय शिंदेवर एकच गोळी झाडली आणि ती सुद्धा त्याच्या डोक्याला लागली’. त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.
परवा दुपारची ही घटना वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पसरली आणि उलट सुलट चर्चेला उधाण आले. बदलापूर घटनेतील प्रमुख आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करून इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न असल्याचे, विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपात तथ्य आहेच. बदलापूर प्रकरणात सुरुवातीपासूनच पोलिसांची कारवाई ज्या धीमेगतीने केली जात होती, त्यात सत्ताधारी राजकीय मंडळींचा हात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. बदलापूर, कल्याण, ठाणे येथील जनतेने उत्स्फूर्त आंदोलन करून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले होते. त्यामुळे पोलीस कारवाईला वेग आला होता. परंतु आता मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा खून करून इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे.
पोलिसांकडून स्वरक्षणार्थ एन्काऊंटर करायला कुणाचीच हरकत नाही. तथापि हा बनाव केलेला एन्काऊंटर आहे, हे साधं शेंबड पोरगंही सांगू शकेल. दिवाळी सणात साधे फटाके फोडण्यासाठी घाबरणारा अक्षय शिंदे पोलिसांच्या कमरेला असलेली बंदूक हिसकावून घेऊन पोलीस व्हॅनमध्ये पोलिसांवर हल्ला करू शकतो? यावर विश्वासच बसत नाही. परंतु पोलिसांच्या पाठीशी सत्ताधारी राजकारणी असतील तर पोलीस काहीही करू शकतात. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘अक्षय शिंदेचे तथाकथित एन्काऊंटर’ हे होय.
विशेष म्हणजे अक्षय शिंदेचे एन्काऊंटर झाल्यानंतर एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून त्याचे स्वागत केले. यावरून राजकारणात किती खालच्या थराला गेले आहे, हे दिसून येते. त्याचबरोबर हे पेढे पोलिसांनाही वाटण्यात आले. निर्लज्जासारखे पोलिसांनीही ते पेढे खाल्ले, याला काय म्हणावे? हा तथाकदीत एन्काऊंटरचा वाद पेटला आहे. अक्षय शिंदेच्या काकांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. निर्भय बनोचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते ॲड. असीम सरोदे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ॲड. असीम सरोदे हे बदलापूर शाळेतील पीडित चिमुकलेची वकीलही आहेत. सत्ताधारी महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या कृतीचे समर्थन करतात, ही अत्यंत निंदनीय बाब म्हणावी लागेल.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका तीन महिन्यावर आलेल्या आहेत. विधानसभा निवडणूक प्रचारात सत्ताधारी पक्षाचे धिंडवडे निघतील यात वाद नाही. आरोपी अक्षय शिंदेला शिक्षा व्हायलाच हवी होती; परंतु कायद्याच्या प्रक्रियेचे उल्लंघन केल्यामुळे न्यायालयाचीच हत्या झाली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सर्वांनाच घाम फोडला आहे. राजकारण कोणत्या थराला चालले आहे, हेच अक्षय शिंदेच्या तथाकथित एन्काऊंटर वरून स्पष्ट होते…!