हिंमत असेल तर ओवैसींवर राजद्रोह लावा; आ. राम कदमांचं खुलं आव्हान

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय तापमान तापलेले दिसत आहे. मशिदींवरील भोंगे, हनुमान चालीसा, स्थानिक निवडणुका, मनसेची आक्रमक भूमिका हे मुद्देदे ताजे असतानांच त्यात आणखी एक भर पडली आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांच्या ओरंगाबाद दौऱ्यावरून नवा वाद पेटला आहे.

अकबरुद्दीन ओवैसी यांनी गुरुवारी औरंगाबाद दौऱ्यादरम्यान औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यामुळे त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासंदर्भात भाजपाकडून महाराष्ट्र सरकारला लक्ष्य करण्यात येत असताना आता या मुद्द्यावरून राम कदम यांनी महाराष्ट्र सरकारला खुलं आव्हान दिलं आहे. एक व्हिडीओ संदेश त्यांनी जारी केला असून त्यात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

अकबरुद्दीन ओवैसी गुरुवारी औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यांनी खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीला यावेळी भेट दिली. त्यांच्यासोबत इम्तियाज जलील, वारिस पठाण असे एमआयएमचे इतर नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते. मात्र, महाराष्ट्राचा शत्रू असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर ते गेल्यामुळे त्यावरून आता वाद सुरू झाला आहे. या घटनेची छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहेत. या मुद्द्यावरून आता भाजपानं राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

“महाराष्ट्र सरकारला लोकांवर राजद्रोहाचा गुन्हा लावण्याचा भारी शौक आहे. एवढी जर तुम्हाला एवढीच हौस आहे, तर राजद्रोहाचा गुन्हा ओवैसींवर लावा ना. तुमची किती हिंमत आहे, किती साहस तुमच्यामध्ये आहे हे महाराष्ट्रातल्या छत्रपतींच्या मावळ्यांना पाहायचंय. ओवैसी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवण्यासाठी जातो? काय कारण?” असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

“ज्या औरंगजेबानं आयुष्यभर छत्रपती शिवरायांना छळण्याचा प्रयत्न केला, कैद केलं. संभाजीराजांचे डोळे फोडले, जीभ छाटली. त्यांना क्रूरपणे मारण्यात आलं. या देशात हिंदूंना राहायचं नाही, राहायचं असेल तर त्यांना जिझिया कर द्यावा लागेल असे जुलमी प्रकार ज्या औरंगजेबानं केले, देशाच्या मातीबरोबर खऱ्या अर्थानं गद्दारी केली. मंदिरं तोडली. अनेकांचा छळवाद मांडला. देशाच्या मातीशी गद्दारी केली, त्या औरंगजेबाच्या कबरीवर कुणी डोकं टेकवण्यासाठी जात असेल तर तो गद्दार नाहीये का? तो राजद्रोह नाहीये का? या सरकारमध्ये जर हिंमत असेल, तर आधी ओवैसींवर राजद्रोह लावावा”, अशा शब्दांत राम कदम यांनी राज्य सरकारला आव्हान दिलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.