चोपडा नगराध्यक्षपदावर अजित पवार गटातर्फे दावा!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

राज्यात नगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार लगबग सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज तिसरा दिवस असताना जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी अत्यंत संथ गतीने उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. चोपडा, भुसावळ, मुक्ताईनगर येथे अद्याप महायुतीतर्फे युती झाल्याचे चित्र स्पष्ट झालेले नाही. चोपडा नगरपालिकेच्या अध्यक्षपदावर डोळा ठेवून माजी नगराध्यक्ष व त्यांची पत्नी जीवन चौधरी यांनी घाईघाईने भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी तेथे महायुतीतर्फे युती होण्याची चिन्ह दिसत नाहीत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात इन्कमिंग जोरात असल्याने त्यांची ताकद वाढली आहे. चोपडा तालुक्यातील नेते माजी मंत्री व माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकून अजित पवारांच्या गटात आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह परवा मुंबई येथे प्रवेश केला. त्यामुळे चोपडा शहर व तालुक्यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण सफाया झाला आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून महायुतीतर्फे नगराध्यक्ष पदावर दावा करून तेथे महायुतीतर्फे राष्ट्रवादी पक्षाला उमेदवारी द्यावी अशी मागणी करून राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे माजी अपक्ष नगरसेवक डॉक्टर रवींद्र पाटील यांच्या पत्नी डॉक्टर कविता पाटील यांची उमेदवारी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी दाखल करण्यात येणार असल्याचे कळते. त्यामुळे चोपड्यात महायुतीतर्फे युती झालीच तर ती राष्ट्रवादी पक्षातर्फे होईल, बाकी नगरसेवक पदासाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादीमध्ये उमेदवार असतील. त्यामुळे जीवन चौधरी यांनी आपल्या घरातील महिलेला लोकनियुक्त नगराध्यक्ष पद मिळेल या आशेवर पाणी फेरले जाण्याची दाट शक्यता आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत आघाडीचे नेतृत्व करून चोपडा नगरपालिकेत आघाडीची सत्ता स्थापन करणारे माजी मंत्री अरुण भाई गुजराती हे आपल्या कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात आल्यामुळे चोपडा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गट प्रमुख दावेदार बनला आहे. आगामी 17 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचे दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची ताकद आता कमी झाली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढल्याने त्यांचा लोककनियुक्त नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांचे चान्सेस वाढलेले असल्याचे स्पष्ट दिसते आहे..

चोपडा नगरपालिका अथवा चोपडा शहरात इतर सर्व पक्षांपेक्षा सत्ताधारी भाजपची ताकद सर्वाधिक असल्याचे जे स्वप्न पाहिले जात होते त्यात आता बदल होऊन चोपड्यात अजित पवारांची ताकद वाढली आहे. त्यामुळे पूर्वी आघाडीमध्ये असलेले जीवन चौधरी यांनी केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे आघाडीतील सर्व नेत्यांना आवडलेले नाही. माजी मंत्री अमळनेरचे अनिल भाईदास पाटील यांनी पुढाकार घेऊन चोपड्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे चोपड्यात राष्ट्रवादीचा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा उमेदवार राहील, असे स्पष्ट चित्र दिसते आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षातर्फे डॉक्टर कविता पाटील यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. ऐनवेळी काही बदल झाला तरी तो राष्ट्रवादी पक्षाचाच उमेदवार असेल एवढे मात्र निश्चित. तसेच चोपडा शहरात शिवसेना शिंदे गटाची ताकद विशेष नाही. त्यामुळे शिवसेनेमध्ये आमदार चंद्रकांत सोनवणे हे राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी राहतील असे दिसते. चोपडा नगरपालिकेतील तिढा महायुतीतर्फे सुटण्याची शक्यता आहे. आता जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपालिकेत मात्र अद्याप महायुतीतर्फे तिढा सुटलेला नाही. मुक्ताईनगरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार शिवसेनेचाच लोकनियुक्त नगराध्यक्ष असावा म्हणून आग्रह धरून मुंबई वारीवर गेले आहेत. पण भाजपवाले म्हणतात, आम्ही आमदारकीची युती केली. शिवसेनेला आम्ही मनापासून पाठिंबा देऊन प्रचंड मतांनी आमदार चंद्रकांत पाटलांना निवडून आणले. आता नगरपालिकेत भाजपचा नगराध्यक्ष असला पाहिजे. त्यासाठी शिवसेनेत भाजपला पाठिंबा द्यावा अशी मागणी करीत आहे. त्यामुळे मुक्ताईनगरमधला युतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भुसावळ नगरपालिका ही जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका आहे. तिथे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे गेल्या तीन टर्म पासून प्रतिनिधित्व करून भुसावळ नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे एससी राखीव आरक्षण आहे, की करून घेतले आहे? हे माहीत नाही पण येथे महाविकास आघाडी तर्फे एससी महिला उमेदवार एकमताने देण्याचा निर्णय झाल्याने घरातच मंत्रीपद आणि नगराध्यक्ष पदाचा हव्यास करणाऱ्या संजय सावकार यांना धडा देण्याचा भुसावळकरांनी चंग बांधला आहे. त्यामुळे संजय सावकारे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी माजी आमदार संतोष चौधरी आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची अभद्र युती होते अशी वक्तव्य करीत आहेत. वास्तविक संतोष चौधरी आणि एकनाथ खडसे हे एकाच राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. त्यामुळे येथेही महायुती उमेदवारांबाबतच्या शक्ती प्रदर्शनाचा विचार कमी पडत असल्याने दांगडो निर्माण झाला आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.