बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क

विरोधक सांगतात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी माझी ओळख आहे. मात्र मला तर अमित शहा नावाने ओळखतात. तुम्हाला ओळखतात का? असा टोला लगावत, तुम्हाला स्वतःचे धंदे नीट करता येत नाहीत. बाप जाद्यांनी एवढे गडगंज करून ठेवले होते ते तुम्हाला सांभाळता येत नाही. आणि तुम्ही 22 हजार सभासदांचा संसार करायला निघालात, असा जोरदार प्रहार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर लगावला आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील कुरवली येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार बोलत होते. यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, साखर महासंघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, निवडणूक समन्वयक किरण गुजर ही उपस्थित होते. पुढे बोलताना पवार म्हणाले, मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीला जे झाले ते झाले गंगेला मिळाले. ते आता उकरत बसू नका. आपल्या मुलाबाळांचा, प्रपंचाचा विचार करा आणि श्री जय भवानी माता पॅनलच्या उमेदवारांना आपले पवित्र मत द्या. माझ्याकडे अर्थखाते आहे. 7 लाख 20 कोटींचा अर्थसंकल्प मी जाहीर केला आहे. राज्यातील साखर कारखान्यांना जे काही देणार आहे, त्यात पहिला मान छत्रपती कारखान्याला राहिल, असेही ते म्हणाले.
भारतीय सैन्याचे बारीक लक्ष !
पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा बदला घ्यावा, असा जोर सर्वांचा होता. त्यानुसार पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जवानांनी कशी कामगिरी केली हे आपण सर्वांनी पाहिले आहे, असे असले तरी पाकिस्तानचे काही सांगता येत नाही म्हणून आजही बॉर्डरवर भारतीय सैन्याचे बारीक लक्ष आहे, अशीही माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

