अजिंठा डोंगरातील वन संपदा धोक्यात

जास्त डिंकासाठी झाडांची हानी

0

 सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

घोसला वनक्षेत्रात तब्बल तीनशे ते साडेतीनशे वृक्षांना खिळे व लोखंडी गज ठोकून झाडांचा डिंक चुकीच्या पद्धतीने काढण्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला.  मात्र वनविभागाने अद्यापही घटनेचा पंचनामा केलेला नाही. दरम्यान या प्रकारामुळे झाडे वाळून वनसंपदा नष्ट होत असल्याचा आढळून आले आहे. संबंधित ठेकेदाराने हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे.  सोयगाव तालुक्यातील अजिंठ्याच्या डोंगरात हा प्रकार सर्वत्र सर्रासपणे सुरू आहे.

सोयगाव प्रादेशिक वन क्षेत्रात सुमारे १८ ते २० हजार हेक्टर वन  क्षेत्र येते. या जंगलात साग, बिब्बा, मोह, कांडोळ, अंजन, अर्जुन, बेहडा, धामोडी  आदी  जैवविविधतेच्या  दृष्टीने महत्वाचे झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र लाकूड तस्कर, वन संपत्ती तोडून लूट सुरु केली आहे. यातच आता भर पडली आहे ती खाद्य डिंक व औषधी उपयोगी  व धूप लोभानसाठी लागणाऱ्या सलई डिंक चुकीच्या पद्धतीने काढून झाडांचे जीव घेण्याचा विडाच संबंधित ठेकेदार व वनविभागाचे कर्मचारी यांनी घेतला आहे. सोयगाव वनक्षेत्र  हे  इको सेन्सिटिव्ह क्षेत्र जाहिर होणे हे गरजेचं आहे. कारण जंगल नष्ट झाले तर याचा फटका पर्यटनास बसेल.

या भागातील डिंक काढण्याचा ठेका हा अजिंठा येथील ठेकेदार यांनी घेतलेला असून २० वर्षांपासून हे टेंडर एकाच कुटुंबात आहे. सदर डिंक काढणारे यांना सक्त सूचना व मार्गदर्शक तत्वे सांगितले असतात की डोंगरातील धामोडी, सलई, बेहडा, बाबुळ आदी झाडांना जास्त खोल व मोठी जखम न करता डिंक जमा करावा. या ४ वर्षात अधिक डिंक काढण्यासाठी घातक रसायने वापरण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने पॅराक्वेट हे विषारी रसायन जे तणनाशक म्हणून वापरले जाते, ते वापरले जात आहे.

सदर रसायने झाडाला जखम करून त्यात स्प्रे केले जाते, त्यामुळे खोडातून लिंफ स्त्राव अधिक स्त्रवतो व सुकल्यावर अधिक डिंक मिळतो. सदर रसायन हे तननाशक असून त्यामुळे ते झाडं सुकून मृत होते. या पद्धतीने  संकलित डिंकात हे विषारी रसायन मिश्रित होऊन मानवास अपाय तर होतोच पण जंगलातील माकड, खार, विविध पक्षी व वन्यजीव हे ही हा डिंक खातात व त्यांच्या ही जीवास धोका निर्माण होऊ शकतो. अशी शेकडो झाडे घोसला, अजिंठा, सोयगाव, बनोटी, सावळदबारा, राक्षा परिसरात कोलमडून  पडली आहेत. हे सर्व प्रकार थांबावे, वन संपदा वाचावी म्हणून  सिल्लोड येथील पर्यावरण संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी शनिवारी उपमुख्यवनसंरक्षक  (डी. सी. एफ.) सुवर्णा माने यांच्याकडे तक्रार केली आहे. यावर आज वनविभाग सोयगाव यांच्यावतीने चौकशीचे सोपस्कार केले जात आहे.

 

डिंकाचे अर्थकारण 

कांडोळचा डिंक २ हजार रु. किलो विकला जातो. तर सलईचा डिंक ही महाग विकला जातो. सलईचे झाडं खूप नाजूक असते. त्यास आघात झाला की सहज तुटते. सलाई डिंक हा संधिवातावरील औषध उत्पादक उद्योग व धूप / लोभान बनवण्यास ५ हजार रु. किलो पर्यंत विकला जातो. या क्षेत्रातून टनाने  कोट्यावधी रुपयाचा डिंक काढला जातो, पण टेंडर मात्र लाख भर रुपयाचे आहे.

 

इको सेन्सिटिव्ह झोन व्हावे

 पॅराक्वेट या तणनाशक व ईथेपोन या प्लांट ग्रोथ प्रमोटरचा सर्रास वापर डिंक अधिक मिळावा म्हणून राज्यात व आमच्या जिव्हाळ्याच्या  अजिंठा डोंगररांगेत  वाढला आहे. हे अत्यंत घातक आहे. हे क्षेत्र आता इको सेन्सिटिव्ह  झोन व गौताळा अभ्यारण्याचा भाग म्हणून जाहिर व्हावा, म्हणून आम्ही समविचारी निसर्ग रक्षक कार्यकर्ते एकत्र येऊन पाठपुरावा करत आहोत. यासाठी एक समिती ही गठीत केली असून, आता हे सर्व जंगल मे अमंगल बंद तर करूच शिवाय  पुष्पाराज ही संपवू . 

– डॉ. संतोष पाटील, अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड

 

Leave A Reply

Your email address will not be published.