लोकशाही न्यूज नेटवर्क
राजधानी दिल्लीनंतर आर्थिक राजधानी मुंबईची हवाही विषारी झाली आहे. मुंबईकरांना श्वसनाचा त्रास, घशांमध्ये खवखव यासारख्या समस्या जाणवत आहेत. मुंबईत होत असलेल्या वायू प्रदूषणामुळे मुंबईकारांना गुदमरल्यासारखे वाटत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता अतिशय खराब निर्देशांकात गेली आहे. मुंबईमधील बहुतेक भागात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) गंभीर पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरात GRAP-4 लागू केले आहे.
प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी बीएमसीकडून मुंबईत GRAP 4 निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईतील अनेक भागातील हवेची गुणवत्ता खराब आणि अतिशय वाईट श्रेणींमध्ये घसरली आहे. या भागात मडगाव, देवनार, मालाड, बोरिवली पूर्व, चकाला-अंधेरी पूर्व, नेव्ही नगर, पवई आणि मुलुंड या भागाचा समावेश आहे.
मुंबई महानगरातील वायू प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने २८ मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.बांधकाम / प्रकल्प स्थळी वायू प्रदूषणास कारणीभूत ठरेल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे बीएमसीने म्हटलेय. ज्या ठिकाणी हवेची पातळी अतिशय खराब झालेली आहे. त्या ठिकाणी बांधकाम थांबवण्याचे आदेश बीएमसीने दिले आहेत. बांधकामांमुळे निर्माण होणाऱ्या धुळीमुळे शहरातील वायू प्रदूषण वाढत आहे. परिणामी बीएमसीने ५० हून अधिक बांधकाम स्थळे थांबवण्याच्या आणि बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.