जळगाव विमानतळातून हवाई कार्गो सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नांना गती
कृषी-उद्योगांना नव्या बाजारपेठा उघडण्याची संधी
जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यातील केळी, कापूस, मका तसेच पाईप, प्लॅस्टिक उत्पादने व चटई यांसह कृषी व औद्योगिक वस्तूंची जलद आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी जळगाव विमानतळातून हवाई कार्गो सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नांना वेग मिळाला आहे. राष्ट्रीय बाजारपेठेची जोड, निर्यात वृद्धी आणि स्थानिक उत्पादनक्षमतेला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लॉजिस्टिक मॉडेल, मागणी विश्लेषण आणि व्यवस्थापन पद्धतींचा सविस्तर अभ्यास सुरू केला आहे.
जळगाव जिल्हा केळी व कापसाच्या उत्पादनात देशात महत्त्वाचे स्थान राखतो. केळी व पपई यांसह फळांची निर्यात, कापूस व मक्याचे देशभरातील गाळ्यांपर्यंत जलद पोहच तसेच औद्योगिक उत्पादनांची वेळेवर वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी हवाई कार्गो हा सर्वात जलद पर्याय ठरणार आहे.
दि. २८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विमानतळावर महत्त्वपूर्ण प्रशासकीय बैठक घेत कार्गो सेवा सुरू करण्याच्या संभाव्यता, आवश्यक सुधारणा व विमान कंपन्यांच्या अपेक्षांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत इन फ्लाईट सर्विसेस एफएलवाय ९१ चे संचालक गौतम सालस्कर, मुख्य महसूल अधिकारी आशुतोष चिटणीस, तसेच जळगाव विमानतळाचे संचालक हरिष त्रिपाठी उपस्थित होते.
बैठकीत हवाई कार्गो टर्मिनलची गरज, जागा निवडी, कोल्ड स्टोरेज सुविधा, सुरक्षा व्यवस्था व पॅकेजिंग युनिट्स उभारण्यावर चर्चा झाली. विशेषतः केळी व पपईसाठी कोल्ड-चेन स्ट्रक्चर मजबूत करणे, शेतकरी-उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षण देणे व निर्यात मानकांची पूर्तता करण्यासाठी सहाय्य उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. पाईप, प्लॅस्टिक, चटई, कृषी-आधारित प्रक्रिया उद्योग आणि मका उद्योगांसाठी हवाई वाहतुकीमुळे नवीन बाजारपेठा खुल्या होतील.
याशिवाय जळगाव व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असल्यामुळे देशांतर्गत नवीन विमानसेवा सुरू करण्याबाबत संभाव्यता तपासण्यात येत आहे. नागपूर, बेंगलोर तसेच दक्षिण भारतातील प्रमुख शहरांदरम्यान नियमित विमानसेवा सुरू करण्याचे धोरणात्मक नियोजन या बैठकीत करण्यात आले. दिल्लीसाठी जयपूर, इंदूर, उदयपूर मार्गे नियमित हवाई सेवा सुरू करण्याचा प्रशासकीय समन्वय, मागणीची घनता व वेळापत्रक यावरही चर्चा झाली आहे, ज्यामुळे जळगाव येथून प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
कुंभमेळ्यासाठी विमानसेवा ही देखील महत्त्वाची ठरणार असून उत्तर भारतातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी जळगाव विमानतळ सोयीचा आणि जवळचा हवाई मार्ग ठरू शकतो. तसेच अजिंठा पर्यटन क्षेत्रालाही हवाई कनेक्टिव्हिटीमुळे चालना मिळेल, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

