कृत्रिम बुद्धिमत्ता ही पत्रकारितेतील मुद्रणानंतरची सर्वात मोठी क्रांती

0

कृत्रिम बुद्धिमत्ता ही पत्रकारितेतील मुद्रणानंतरची सर्वात मोठी क्रांती

एआयचा वापर करताना पत्रकारांनी सजग व विवेकशील राहावे – प्रा. डॉ. सदानंद मोरे

जळगाव (प्रतिनिधी) : मुद्रणकलेनंतर जर कोणती तांत्रिक क्रांती मानवाच्या जीवनावर आणि विचारप्रणालीवर सर्वाधिक प्रभाव टाकणारी ठरली असेल, तर ती कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयची आहे. मानवी मेंदूला आव्हान देण्याची क्षमता असलेली ही तंत्रप्रणाली पत्रकारितेसाठी जितकी उपयुक्त आहे, तितकीच ती संवेदनशीलही आहे. त्यामुळे पत्रकारांनी एआयचा वापर अधिक जागरूकतेने, नैतिकतेच्या चौकटीत आणि विचारपूर्वक करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

मराठी पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्रातील दहा विद्यापीठांच्या जनसंवाद व पत्रकारिता विभागांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. ६ जानेवारी) ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि माध्यमे’ या विषयावर विशेष ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे हे सहावे वर्ष असून यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुढाकाराने हा संयुक्त कार्यक्रम पार पडला.

या ऑनलाइन व्याख्यानात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (नागपूर), शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पुणे), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (छत्रपती संभाजीनगर), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ (सोलापूर), मुंबई विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड), गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली) आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (मुंबई) या विद्यापीठांचा सहभाग होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सदानंद मोरे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार डॉ. धनंजय बिजले आणि प्रा. डॉ. योगेश बोराटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. मोरे यांनी पत्रकारितेचा ऐतिहासिक प्रवास उलगडून सांगताना नमूद केले की, एआयचा शोध जरी पूर्वी लागला असला, तरी सध्याच्या काळात त्याचा वापर अभूतपूर्व वेगाने वाढत आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाला जसे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू असतात, तसेच एआयचेही आहेत. त्यामुळे पत्रकारांनी एआय-साक्षर होऊन या तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर करणे ही काळाची गरज आहे.

ज्येष्ठ पत्रकार डॉ. धनंजय बिजले यांनी एआयमुळे बातम्यांमध्ये साचेबद्धता येण्याचा धोका असल्याकडे लक्ष वेधले. हेडलाईन तयार करणे, मजकूर मांडणी, माहिती संकलन यासाठी एआयचा वापर होत असला, तरी चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होण्याचा धोका वाढत असल्याने फॅक्ट-चेकिंगला अधिक महत्त्व देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. डॉ. योगेश बोराटे यांनी माध्यम क्षेत्रात एआयचा बहुआयामी वापर कसा करता येईल, यावर सविस्तर प्रकाश टाकला. केवळ मजकूरनिर्मितीपुरता मर्यादित न राहता संशोधनात्मक आणि तपास पत्रकारितेसाठीही एआय प्रभावी साधन ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले.

या व्याख्यानप्रसंगी प्रा. डॉ. निशा मुडे-पवार (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), प्रा. राम भावसार (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), प्रा. डॉ. संजय तांबट व प्रा. डॉ. माधवी रेड्डी (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), प्रा. डॉ. दिनकर माने (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), प्रा. डॉ. सुहास पाठक (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ), प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर (सोलापूर विद्यापीठ), प्रा. डॉ. प्रबास साहु (नागपूर विद्यापीठ), प्रा. डॉ. सुंदर राजदिप (मुंबई विद्यापीठ), प्रा. डॉ. मीरा देसाई (एसएनडीटी महिला विद्यापीठ) आणि प्रा. डॉ. सरफराज अन्सारी (गोंडवाना विद्यापीठ) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. संजय तांबट यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. गोपी सोरडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. रोहित देशमुख, मंगेश बाविसाने, डॉ. वृषाली बर्गे आणि डॉ. मनीषा मोहोड यांनी विशेष परिश्रम घेतले.

या ऑनलाइन व्याख्यानाला राज्यातील विविध विद्यापीठांतील शेकडो विद्यार्थी, प्राध्यापक आणि पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

Leave A Reply

Your email address will not be published.