लोकशाही संपादकीय लेख

महाराष्ट्राचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे विधानसभा अधिवेशनात रमी खेळतात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न असताना शेतकऱ्यांना उद्देशून वायफळ बडबड करतात. अशा कृषीमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी विरोधक मागणी करतात, तेव्हा “मी काय बलात्कार केला आहे का..? त्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही..” असे ठामपणे सांगणारे कृषी मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांमुळे माफी मागून मोकळे होतात. ‘पुन्हा असे करणार नाही’ अशी तंबी देऊन अजित पवारांनी कोकाटे यांना अभय देतात. अशा कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांचे काही भले होईल, ही अपेक्षा आता फोल ठरते आहे.
सध्या खरीप पिकासाठी रासायनिक खतांची शेतकऱ्यांना आवश्यकता असताना खताचा तुटवडा दाखवून कृषी केंद्राचे विक्रेते शेतकऱ्यांना रासायनिक खते देत नाहीत. याचा ते काळाबाजार करतात. जळगाव जिल्ह्यातील कृषी विभागाच्या भरारी पथकाने जिल्ह्यात धाडी टाकून एकूण तीन कृषी केंद्रांची थेट परवाने रद्द केले तर बारा कृषी केंद्रांचे परवाने निलंबित केले. जळगाव जिल्ह्यातील कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या या कारवाईबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांविषयी थोडीही कळवळा नाही. तरीसुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खाते देऊन कृषिमंत्री का केले? हे एक न उलघटणारे कोडे म्हणता येईल. दुसऱ्या सक्षम आमदाराकडे हे कृषी खाते सोपविणे आवश्यक आहे असे अजित पवारांना वाटत नाही का?
अलीकडे महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत खालच्या थराला गेलेले आहे. गृहमंत्री योगेश कदम याच्या आईच्या नावाने बेकायदा डान्सबार चालवतो. मंत्र्यांकडून कायदा मोडला जात असेल तर गृह खाते कारवाई करेलच कसे? सध्या खरीप पिके शेतात वाढीला लागले आहेत. अशावेळी खरीप पिकांना रासायनिक खतांची मागणी असताना, त्याचा पुरवठा करणे गरजेचे असताना शेतीसाठी लागणारे कृषी केंद्रातून माल मिळायला हवा. परंतु रासायनिक खताचा तुटवडा आहे, असे भासवून शेतकऱ्यांना खते न देणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील तीन कृषी केंद्रांचे थेट परवाने रद्द करण्यात आले. जिल्ह्यातील बारा कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. कृषी अधिकारी यांनी केलेल्या कारवाईबद्दल ते अभिनंदन आस पात्र आहेत..!


