जल, जमीन अन् जंगल समृद्ध करणार कृषी महोत्सव!
जैन हिल्स येथे हायटेक शेतीचा हुंकार : थेंब थेंब पाणी जीवनात चैतन्य आणी
जळगाव : दीपक कुळकर्णी
सेत आले सुगी सांभाळावे चारी कोण!
पिका आले परी केले पाहिजे जतन!!
सोंकरी सोंकरी विसावा तोवरी!
नको खाऊ उभे आहे तो!!
गोफणेसी दिंडी घाली पागोऱ्याच्या नेटें!
पळती हाहाकारें अवघी पाखरांची थाटे !!
पेटवूनि आगटी राहे जागा पालटूनि!
पडिलिया मान बळ बुद्धि व्हावी दोनी!!
खळे दानें विश्व सुखी करी होता रासी!
सारा सारूनिया ज्याचे भाग देई त्यासी!!
तुका म्हणे मग नाही आपुले कारण!
निज आले हातां भूस सांडिले निकण!!
शेतकऱ्याला सदैव जागरूक राहण्याचा, नित्य सावध राहण्याचा सल्ला देणारा हा अभंग शब्दरचना आणि आशय या दोहोंच्या विलक्षण लावण्याने नटला आहे. आपले जीवन सुखीसमाधानी व यशस्वी करू इच्छिणाऱ्या सर्वच व्यक्तींच्या दृष्टीने तो आस्वाद्य बनला आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला सुखाचे दिवस यावेत याच मुख्य उद्देशाने स्व. भवरलाल जैन यांनी जैन उद्योग समूहाच्या माध्यमातून कार्य करण्याचा विडा उचलला. स्व. मोठ्याभाऊंच्या या उद्दात्य हेतून आज शेकडो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. काळ्या आर्इच्या कुशीत हिरवी पिके जोमाने डोलू लागली आहेत. शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, स्पर्धेच्या युगात शेतकऱ्यांना हायटेक सुविधा उपलब्ध व्हाव्यात याच उद्देशाने गेल्या 14 डिसेंबरपासून ‘हायटेक शेतीचा हुंकार’ हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जैन हिल्सच्या हिरवळीवर या महोत्सवाला प्रारंभ झाला असून उत्तर महाराष्ट्रातून रोज शेकडो शेतकरी या हायटेक यंत्रणेचा प्रत्यक्ष लाभ घेत आहेत. ‘थेंब थेंब पाणी जीवनात चैतन्य आणी’ या शिर्षकाखाली जैन समूह बळीराजाच्या जीवनात खऱ्या अर्थाने चैतन्य आणण्याच्या उद्देशाने मार्गक्रम करीत आहे. शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणाऱ्या या महोत्सवाला शेतकऱ्यांनी भेट देणे आवश्यक आहे.
एखाद्याने अपार कष्ट करून एखाद्या सुंदर गोष्टीची निर्मिती केली आणि नंतर तिचे रक्षण करण्याच्या बाबतीत हलगर्जीपणा केला, तर निर्माण केलेले सगळे गमावून बसण्याचा धोका निर्माण होतो. तसे घडू नये, म्हणून संत तुकारामांनी अत्यंत तळमळीने सोंकरीला चार गोष्टी सांगितल्या आहेत. सोंकरी म्हणजे राखण करणारा. मशागत करून, खोल ओलीला बी टाकणारी पेरणी करून, योग्य वेळी पुन्हा पुन्हा पाणी देऊन आणि तन काढून पिकाची सर्व प्रकारे काळजी घेतल्यानंतर पीक कणसांनी बहरून येते. कणसे दाण्यांनी काठोकाठ भरतात. शेतावर नजर टाकली, की शेतकऱ्याचा ऊर अभिमानाने भरून येतो. सुगी झाल्यावर घरामधे जणू काही रिद्धी-सिद्धी नांदू लागणार, असे वाटून पुढच्या वर्षभरात काय-काय करायचे, याची मधुर स्वप्नं त्याच्या डोळ्यात तरळू लागतात. पण हीच वेळ जागे राहण्याची असते. थोडासा बेसावधपणा झाला, तर डोळ्यांपुढे चमकणारे सगळे वैभव लुटले जाण्याचा धोका असतो. म्हणून शेत सुगीवर आले, पीक पक्व झाले, की शेतकऱ्याने चारी कोपऱ्यांनी शेताची राखण करण्याची व्यवस्था केली पाहिजे. सर्व बाजूंनी ते सांभाळले पाहिजे. शेतात समृद्ध पीक आले आहे हे खरे, पण त्याचे काळजीपूर्वक जतन केले पाहिजे. हे जनत आजच्या धकाधकीच्या जीवनात कसे होर्इल ते हायटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शक्य झाले आहे. जैन हिल्स येथील कृषी महोत्सवात विविध प्रकारच्या उपकरणांची जणू जत्राच भरली आहे. ऑटोमेशनद्वारे पिकांना कशा पद्धतीने पाणी दिले जाते हे येथे अनुभवण्यास मिळत आहे. ऑटोमेशनच्या माध्यमातून घरबसल्या शेतीला पाणी देणे शक्य झाले आहे. या यंत्रणाद्वारे मोबार्इलच्या माध्यमातून व्हॉल्व फिरविणे सोपे झाले आहे. किती वेळा नंतर पिकांना किती पाण्याचा पुरवठा करावा हे या यंत्राद्वारे सहज शक्य झाले आहे. या यंत्राद्वारे शेतीमधील ओलावा देखील मोजला जातो.
शुद्ध पाण्याचा होता वापर
फिल्टटेशन सिस्टिमद्वारे पिकांना खतांची मात्रा देखील दिली जाते. पिकांना दिले जात असलेले पाणी अशुद्ध असले तर मोठ्या प्रमाणावर रोगरार्इ पसरण्याची शक्यता असते. मात्र फिल्टटेशन यंत्रामुळे हा धोका टाळता येवू शकतो. या यंत्राच्या साह्याने पाण्याची क्षार, गाळ, शिवाळे, खडे दूर करुन पिकांना शुद्ध पाणी दिले जाते. यंत्रातील जाळी पाण्यातील शेवाळे, खडे, क्षार अलगद बाजूला सारते. सर्व पिकांना खतांची मात्रा देण्याची व्यवस्था देखील याच यंत्राच्या माध्यमातून आहे.
विकसित तंत्रज्ञान पोहचविण्याचा उद्देश
हायटेक शेतीच्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना स्पर्धेच्या युगात लाभ होणार आहे. शेतीतील नवीन विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानेच या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बेड स्टीमरवर ठिबक संच बसवून केळीची लागवड, हा हायटेक शेतीतील नवा उपक्रम येथे आहे. पीक आच्छादनासह पीक शीतकरण प्रणाली, तापमान वाढ नियंत्रित करण्यासाठी स्प्रिंकलर प्रणाली, कापूस पिकामध्ये ठिबक मल्चिंग आणि गादीवाफाचा त्रिवेणी संगम, गादीवाफा ड्रिप प्रणालीवर आंबा, हरभरा, पेरू, मोसंबी, संत्रा यांची लागवड अनुभवता येते. हवामान बदलाच्या संकटावर शेडनेट, पॉलीहाऊस, ग्रीन हाऊस यांसारख्या बंदीस्त व नियंत्रित वातावरणाच्या माध्यमातून बागकामाची किती गरज आहे हे अनुभवता येते. जैन टेकड्यांवर केळी, आंबा, जैन गोड संत्रा यांची बाग शेतकऱ्यांना भुरळ घालत आहे.
हवामानापासून केळीचे संरक्षण
केळीच्या ग्रँडन जातीची शेडनेटमध्ये लागवड, अवकाळी पाऊस आणि गारपिटीपासून संरक्षण करण्यासाठी, बिगर मोसमी गादीवाफाचा वापर, दोन ठिबक नळ्या आणि मल्चिंग, बागेत फळांची निगा कशी ठेवता येईल याचा अभ्यास येथे करता येते. मोकळ्या शेतात ग्रँड नैनसह नेंद्रन, पूवन, बंथाल आणि लाल केळीच्या जातींची लागवड करता येते.
शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
शेती करणे आता परवड नाही अशी ओरड सर्वत्र होत असली तरी या महोत्सवात शेती कशा पद्धतीने केली तर त्याचा फायदा होतो हे प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळत आहे. शेतीकडे व्यापार म्हणून पाहिले तरच त्यातून मोठे उत्पन्न घेता येते. हायटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीवरील विविध प्रयोग येथे पाहण्याची सुविधा आहे. शेतकऱ्यांनी या महोत्सवाचा लाभ घेवून जीवनात चैतन्य निर्माण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.