हरभरा पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग; खरीपाने मारले अन रब्बीने तारले

0

रजनीकांत पाटील, जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

निसर्गाच्या अवकृपेमुळे जिल्हात शेतकर्‍यांच्या हातातून खरीप हंगाम गेला होता. मात्र खरीपात मारणार्‍या निसर्गाने रब्बीत शेतीनिर्भर घटकाला तारले आहे. गावोगावी हरभरा कापणी व काढणीसाठी लगबग दिसून येत आहे. हंगाम चांगला असली तरी मजुरांची टंचाई, वाढलेली मजूरी व थ्रेशर मशीनवाल्यांनी वाढवलेले दर यांचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. हरभर्‍याला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 4 हजार 200 ते 5 हजार 200 रूपयांचा भाव मिळत आहे.

हरभर्‍याची शेती बर्‍यापैकी खाली झाली असून दादरसाठी अजून 10 ते 15 दिवसांचा अवधी आहे. दादरला वादळी वार्‍याचा जिल्ह्यात काही ठिकाणी फटका बसला होता. जिल्ह्यातील रब्बी हंगामातील बहुतांश पिकांची काढणी सुरू असून बाजार समितीत मोठ्या प्रमाणात धान्याची आवक वाढली आहे. त्यात रब्बीतील मुख्य पीक असलेला हरभरा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाजारातही आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा विक्रीसाठी दाखल झाला असून, त्यापैकी बहुतांश हरभरा नवीन आहे. हरभर्‍याला प्रतिक्विंटल 4 हजार 400 ते 5 हजार 200 रुपये भाव मिळाला आहे. यासोबतच बाजारात मका आणि गव्हाची आवकही आहे.

हरभर्‍याची आवक दिवसाला सरासरी 5 हजार क्विंटलपर्यंत असून त्याखालोखाल मका 500 क्विंटल, ज्वारी 200 क्विंटल, बाजरी 300 क्विंटल, गहू 400 क्विंटल, दादर 50 क्विंटल तर सूर्यफूल 30 क्विंटल, दादर 50 क्विंटल एवढ्या धान्यांची आवक बाजार समिती दिवसाला होते.

तालुक्यात सूर्यफूल या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र खूप कमी असल्याने बाजार समितीत त्याची आवकही खूप कमी असते. अमळनेर बाजार समितीत सद्यःस्थितीत एका दिवसाला सरासरी 30 क्विंटल सूर्यफुलाची आवक असून त्याला प्रतिक्विंटल 6 हजार 900 एवढा दर मिळत आहे.

अमळनेर येथील बाजार समितीत अमळनेरसह चोपडा, शिरपूर, तापी-काठ भागातील गावे, पारोळा, धरणगाव तालुक्यातील गावे, शिंदखेडा पांझराकाठ भागातील गावे येथून माल विक्रीसाठी येत असतो. रोख व्यवहार, झटपट वजनकाटा यामुळे अमळनेर बाजार समितीस शेतकर्‍यांकडून पसंती दिली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.