जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) २०२१ बॅचचे अधिकारी आदित्य जिवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने सोमवारी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करत ही नियुक्ती जाहीर केली.
आदित्य जिवणे हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथे महावितरण (महाडिस्कॉम) मध्ये सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. प्रशासनातील अनुभव आणि कार्यक्षमतेच्या बळावर त्यांच्याकडे जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जळगाव महापालिकेचे विद्यमान आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. शासनाच्या आदेशानंतर या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. मात्र, ज्ञानेश्वर ढेरे यांची पुढील नियुक्ती नेमकी कुठे करण्यात आली आहे, याबाबत शासनाकडून अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी आपल्या बदलीच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, प्रशासनाला अद्याप अधिकृत आदेश प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आदित्य जिवाणे यांच्या नियुक्तीमुळे जळगाव शहरातील नागरी सुविधा, विकासकामे आणि प्रशासनिक कार्यप्रणालीला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विविध स्तरांतून त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात येत असून ते लवकरच नवीन पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.


