लोकशाही विशेष लेख

मराठी महिन्यांची नावे चांद्र-सौर धरतीवर आणि मुख्यत्वे पौर्णिमेच्या दिवशी आकाशात दिसणाऱ्या नक्षत्रावर आधारावर पडलेली आहे. उदाहरणार्थ जेष्ठ नक्षत्रावरून ज्येष्ठ महिना असे. चैत्र पासून ते फाल्गुन महिन्या पर्यंत बारा महिन्यांची कालगणना रूढ व प्रचलित आहे. हिंदू कालगणना ही चंद्र व सौर गणनेवर आधारित असून सौर वर्ष व चंद्र वर्ष यामध्ये साधारण अकरा दिवसाचे अंतर पडते. चांद्र वर्ष ३५४ दिवस, तर सौर वर्ष३६५ दिवसांचे असते. हे अंतर भरून काढण्यासाठी आणि सणांचे ऋतू बदलू नये म्हणून अधिक मास हा तीन वर्षातून एकदा तेरावा महिना असतो. यालाच ‘अधिक मास’ म्हटलेले आहे.
वैज्ञानिक व खगोलशास्त्रीय पार्श्वभूमी असलेल्या अधिक मासास धार्मिक महत्त्व सुद्धा आहे. पौराणिक कथेनुसार, या अतिरिक्त महिन्याला प्रारंभी ‘मलमास’ म्हटले जायचे. या महिन्यात लग्न, मुंज, वास्तुपूजन, गृह प्रवेशासारखे शुभ कार्ये केली जात नसत. त्यामुळे दुःखी झालेल्या या महिन्याला भगवान विष्णूंनी आपल्या सहस्त्र नावांपैकी एक नाव असलेले ‘पुरुषोत्तम’ हे नाव बहाल केले. याशिवाय या महिन्याला आणखीन एका नावाने ओळखले जाते. तो म्हणजे ‘धोंड्याचा महिना’ होय. या नावामागे कुठलीही धार्मिक पार्श्वभूमी नसून, महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतून हे नाव पडल्याचे दिसते.
वऱ्हाडी बोली भाषेत दगडाला धोंडा म्हटले जाते. परंतु लोकपरंपरेत चक्क धोंड्याचा महिना म्हटलेले आहे हे फार गमतीशीर वाटते. तर एका खाद्य पदार्थाला जो पुरणापासून बनविला जातो, त्याला धोंडा असे म्हटले आहे. जो देवाला नैवेद्याच्या स्वरूपात अर्पण करतात, तर जावयाला भेट म्हणून देण्याची लोकप्रथा आहे. महाराष्ट्रात धोंड्याच्या महिन्याचे कौटुंबिक आणि सांस्कृतिक महत्त्व सर्वदूर आढळून येते नुकतेच लग्नसराईचा हंगाम संपलेला आहे. अर्थात नवपरिणीत दाम्पत्यांना या महिन्यात मोठी आनंददायी आणि कौटुंबिक खेळीमेळीची पर्वणी असते. या महिन्यात विवाहित लेकीला माहेरी आग्रहाने पंच पक्वान्नांच्या भोजनासाठी सन्मानाने आमंत्रित केले जाते. पती-पत्नीच्या जोडप्यांना धार्मिक परंपरेनुसार, लक्ष्मी-नारायणाचे प्रतीक मानले आहे.
मुलीचा पती जावई हा सासरच्यांसाठी नारायण (भगवान विष्णू) समान मानला जातो. त्यांचा आदर, सन्मान घरी बोलावून करतात. त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी औक्षण केले जाते. प्रसंगी मुलीची ओटी भरून वाण देण्याची ही प्रथा महिला भगिनी पार पाडतात. जावयाला वस्त्र, सोने, चांदी आदी धातू भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. जावई व लेकीसाठी खास भोजन बनविले जाते. यातून नात्यातील आदर, कौटुंबिक प्रेम, आपुलकी, आणि जिव्हाळा वृद्धीगत होत असतो. यातून लेक व जावई घरी आल्याचे कौटुंबिक समाधान मिळते.
हल्ली कुटुंब छोटी झालीत. शिवाय नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने ग्रामसंस्कृती पासून दूरदेशी शहरात विस्थापित झाली आहे. त्यामुळे लोक परंपरा, प्रथा, कुटुंब व्यवस्थेत समरसता क्षीण होताना दिसते. आपल्या स्वतःच्या करिअरला प्राधान्य देत असतानाच, तीन वर्षातून एकदा येणारा हा महाराष्ट्रातला कौटुंबिक लोकोत्सव महाराष्ट्र मन सांभाळत आहे. जो साता समुद्रापलीकडे वसलेल्या संस्कृतीशी नाळ जुळलेल्या मराठी मनांना खुणावत असतो. अधिक मास केवळ धार्मिक, खगोलशास्त्रीय, अध्यात्मिक, सात्विक काळापुरताच मर्यादीत नसून कौटुंबिक लोकोत्सव सुद्धा आहे.

दारव्हा, जि. यवतमाळ
मो. ९१३०८३५४५८


