लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील आडगाव येथे एका शेतकऱ्याने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना २९ मार्च रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव विनोद मार्तंड कोळी (वय ४०, रा. आडगाव, ता. यावल) असे आहे. ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीतून करत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
शनिवारी सकाळी विनोद कोळी शेतात गेले होते, तेथे त्यांनी विष प्राशन केले. गावकऱ्यांनी तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर कुटुंबीयांनी हंबरडा फोडला, तर संपूर्ण आडगाव गावात शोककळा पसरली. प्राथमिक स्वरूपात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, पुढील तपास यावल पोलीस ठाण्यातून सुरू आहे.