“..तर मुलींनी बापाचा खून करावा’, अभिनेत्री अलका कुबल संतापल्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगावमध्ये झालेल्या खान्देश करिअर महोत्सवाच्या निमित्तानं अभिनेत्री अलका कुबल जळगावमध्ये उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. बाप जर मुलींवर बलात्कार करत असेल, तर मुलींनी अशा बापाचा खूनच करावा. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपल्या देशातही आखाती देशांप्रमाणे कठोर कायदे असायला हवेत, असं आवाहनही अलका कुबल यांनी केलं आहे.

अभिनेत्री अलका कुबल म्हणाल्या की, महिलांवर अत्याचार रोखायचं असतील तर आखाती देशांप्रमाणे कठोर कायदे असायला हवे, त्यात एखादा बापच जर मुलीवर अत्याचार करत असेल तर मुलींनी अशा बापाचा खूनच करायला हवा. पालकांनी प्रत्येक मुलाचा कल ओळखणं आवश्यक आहे. फक्त इंजिनिअर, डॉक्टर किंवा वकील बनणं हेच ध्येय नसावं. शेती, नर्सिंग, शिक्षण क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रातही मुलं उजळू शकतात.याकडेही लक्ष द्यायला हवं. मुलांचे मानसिक आरोग्य बिघडू नये, म्हणून पालकांनी मुलांवर अपेक्षांचं ओझं टाकू नये. कमी मार्क मिळाले तरी योग्य दिशा दिल्यास या मुलांचं यशस्वी करिअर घडू शकतं.

लहान वयातच मोबाईलच्या अतिरेकामुळे मूलभूत संस्कार हरवत चालले आहेत. घरात मोठ्यांचे मार्गदर्शन आणि एकत्रित कुटुंबपद्धतीमुळे चांगले संस्कार रुजतात, असा  आपला अनुभव असल्याचं अलका कुबल यांनी सांगितलं आहे. स्वतःच्या करिअरमध्ये सासू-सासऱ्यांच्या पाठिंब्यामुळे आणि योगदानामुळे आपल्याला यश मिळालं, हे त्यांनी खासपणे नमूद केलं आहे. तसेच एकटेपणा सुखद नाही, कुटुंब हवंच, आई होण्याचा अनुभव जगातला सर्वोत्तम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.