पिंपरखेड येथे गोमांस विक्रीवर कारवाई
सात जण जखमी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; टोळक्यावरही कारवाईची शक्यता
चाळीसगाव | चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे गोमांसाची अवैध विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गो-रक्षकांसह ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. कारवाईदरम्यान काही जणांच्या टोळक्याने पोलिस पथकावर, पंच व साक्षीदारांवर विटांचा हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात सात जण जखमी झाले असून या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरक्षकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी सकाळी सुमारे ८.३० वाजता ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, पो.हे.कॉ. रविंद्र रावते, संदीप ईश्वर पाटील आणि पो.कॉ. संदीप पोपट पाटील यांच्या पथकाने पिंपरखेड येथे छापा टाकला. तपासणीदरम्यान तेथे गोमांसाची विक्री सुरू असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी गोमांस विक्रेते ईस्त्राइल भिकन कुरेशी (वय ३५) व शेख भिकन कुरेशी (वय ४६, दोन्ही रा. पिंपरखेड) यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र, यावेळी काही जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवत विटा फेकल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली.
हल्ल्यात स.पो.नि. नितीन पाटील, उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, पो.हे.कॉ. रविंद्र रावते, संदीप ईश्वर पाटील, पो.कॉ. संदीप पोपट पाटील यांच्यासह नीलेश भिकन पवार, सिद्धार्थ दिलीप मोरे (दोघे रा. पिंपरखेड) आणि नितीन शेलार असे एकूण सात जण जखमी झाले. सर्व जखमींवर चाळीसगाव येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिस शिपाई संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात ईस्त्राइल व शेख भिकन कुरेशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिस, पंच व साक्षीदारांवर हल्ला करणाऱ्या टोळक्यांविरोधातही दुपारी उशिरा स्वतंत्र गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून, पोलिसांनी काही संशयितांची धरपकड केल्याचे समजते.