जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यात आकाशात पतंग उडवण्यास सुरुवात झाली असून विविध प्रकारचे मांजा विक्रीसाठी आले आहे. दरम्यान शासनाकडून प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्रीवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव आणि भुसावळ येथे छापे टाकुन कारवाई केली. डिसेंबरच्या सुरुवातीलाच केलेल्या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरातील पतंग गल्ली जोशीपेठ भागात कारवाई करून किरण भगवान राठोड याचेवर शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून ४ हजार ८०० रुपयांचे १६ नायलॉन मांजा चक्री जप्त केल्या आहेत. तर कुणाल नंदकिशोर साखला याचेवर शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ८ हजार ८०० रुपयांचे ३२ नायलॉन मांजा चक्री जप्त करण्यात आल्या आहेत.
सदर पथकाने भुसावळ शहरात भज्जेगल्ली सराफ बाजारातील अजय काईट नावाचे दुकानावर छापा टाकुन नितीन गोपाळ पतकी याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून १ हजार ४०० रुपयांच्या ६ नायलॉन मांजा चक्री जप्त करण्यात आल्या.