जळगाव : रतनलाल सी. बाफणा फाऊण्डेशन ट्रस्टच्या वतीने शाकाहार, अहिंसा, जीवदया, पर्यावरण रक्षण, गोवंश संवर्धन, समाजसेवा, मानवसेवा इत्यादी विषयास अनुसरुन उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना आचार्य हस्ती अंहिसा कार्यकर्ता अवार्ड ने सन्मानित केले जाते. वर्ष १९९७ मध्ये भगवान महावीर फाउंडेशन चेन्नईच्या वतीने अहिंसा,प्राणी रक्षा,शाकाहार प्रचार प्रसार व मानव सेवेसाठी स्वर्गीय रतनलालजी बाफना यांना भगवान महावीर अवार्डने सन्मानित करण्यात आले होते.स्मृतिचिन्ह व रोख पाच लाख असे पुरस्काराचे स्वरूप होते.या पुरस्कारातून प्रेरणा घेऊन त्यांनी या क्षेत्रात काम करणाऱ्या सन्माननीय मान्यवरांना रतनलाल सी.बाफना फाउंडेशन ट्रस्ट द्वारे दरवर्षी पुरस्कृत करण्याचे जाहीर केले आणि १९९८ पासून या पुरस्कार वितरण कार्याला सुरुवात झाली. आता पर्यंत 35 मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.स्मृति चिन्ह व पाच लाख रुपये रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे.विशेष म्हणजे बाफणाजींनी स्वतः चयन समितीसोबत चर्चा करून श्रीमती सुशीला बोहरा यांच्या नावाची निवड केली होती.आणि त्यांना निवड केल्याबाबत व त्यांच्या कामाचा गौरव करण्याबाबतचा शुभेच्छापर व्हिडीओ सुद्धा रेकॉर्ड करून ठेवला होता.आजच्या समारोहात उपस्थितांना हा व्हिडीओ दाखविण्यात आला असता,बाफणाजींच्या मनोगताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावर्षी जोधपूर येथील श्रीमती सुशिला बोहरा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती सुशिलाजी बोहरा यांनी संकटग्रस्त विधवा महिला, नेत्रहीन, मूक,बधिर,मानसिक रुग्णांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.सात हजार महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून त्यांना स्वयं रोजगार प्राप्त करून दिलेला आहे.अनाथ नवजात शिशुंसाठी लवकुश बालविकास केंद्रामार्फत त्या कार्य करत आहेत.सोबतच करुणा क्लब मार्फत अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपणाचे मोठे काम त्यांनी करवून घेतले आहे.अपंगांच्या कल्याणासाठी केलेल्या कार्यानिमित्त त्यांना वर्ष १९९२ मध्ये उपराष्ट्रपती के आर.नारायणन यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय पुरस्कार, वर्ष २०१३ मध्ये उपराष्ट्रपती मा.हामिद अन्सारी यांच्या हस्ते महावीर पुरस्कार,नेत्रहीनांसाठी केलेल्या कार्यानिमित्त तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते वर्ष २००७ मध्ये सर्वश्रेष्ठ NGO पुरस्कार अशा १६ पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलेले आहे.
आज रविवार दिनांक 19 जून रोजी अहिंसा तीर्थ, रतनलाल सी.बाफना गोशाळेच्या सुशील सभागृहात त्यांना माजी खासदार मा.ईश्वरलालजी ललवाणी व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते अहिंसा अवार्डने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला कांतीलाल चौधरी- धुळे, श्रीमती तारादेवी रतनलाल बाफना, कस्तुरचंद बाफना, कंवरलाल संघवी, सज्जनराज बाफना,सुशीलकुमार बाफना, सागरमल सेठीया, संदीप जैन,सुनीलकुमार बाफना हेमंत कोठारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
रतनलालजी बाफना यांच्या निधनानंतर संस्थेच्या विश्वस्तांनी बाफणाजींनी सुरु केलेले सर्व सामाजिक कार्य अविरत सुरु ठेवले असून त्यातला आचार्य अहिंसा अवार्ड कार्यक्रम आज थाटात संपन्न झाला.बाफणाजींच्या अनुपस्थित आचार्य हस्ती अवार्डचे पहिल्यांदाच वितरण होत असल्याने आजच्या कार्यक्रमात मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करून त्यांच्याबद्दलच्या आठवणी जागवल्या. त्यांच्या जाण्याने समाजाची झालेली हानी कधीही भरून निघणार नसल्याच्या भावनाही अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या.
प्रभू प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार व उद्बोधनानंतर पुरस्कार प्राप्त श्रीमती सुशीला बोहरा यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. हे सर्व पुण्य कार्य करण्यासाठी मला आचार्यश्री हस्तीमलजी महाराज यांच्याकडूनच प्रेरणा आणि आशीर्वाद लाभल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून आपल्या भाषणात केला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सीमा पारख व अनामिका कोठारी यांनी, तर आभार प्रदर्शन सुशीलकुमारजी बाफना यांनी केले. कार्यक्रम सफलतेसाठी श्री जैन रत्न हितैषी श्रावक, श्राविक मंडळ, जैन रत्न युवक, युवती मंडळ, रतनलाल सी.बाफना फाऊण्डेशन ट्रस्टचे पदाधिकारी व अहिंसा तीर्थ गोशाळेच्या कर्मचारी बांधवांनी परिश्रम घेतले