चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोक्सो व अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपी सलमान खान अख्तर खान (वय 28 वर्षे, रा. हमीद नगर, चोपडा) यास पाच वर्ष सक्तमजुरी व 5 हजार 500 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास 6 महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे, असा निकाल अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने नुकताच दिला. या प्रकरणाचा तपास व न्यायालयीन पाठपुरावा प्रभावीपणे केल्याने चोपडा शहर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर असे की, दि. 12/08/2024 रोजी 10 वर्षीय अल्पवीयन मुली सोबत घडलेल्या विनयभंगसह अत्याचाराच्या घटने बाबत चोपडा शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्रमांक 385/2024 भारतीय न्याय संहिता कलम 74, 75(2), 332 (क), पोक्सो अधिनियम कलम 7, 8 सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम कलम 3(1) (डब्ल्यू) (1) (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी भक्कम पुरावे व साक्षी न्यायालयासमोर सादर केल्या. त्यानंतर न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 65, 103 (1) तसेच पोक्सो अधिनियम कलम 4, 5, 6 व 5 (7) अन्वये गुन्हा सिद्ध झाला. त्यानुसार मा. जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सी व्ही पाटील मॅडम अमळनेर यांनी आरोपीस 5 वर्ष सक्तमजुरी तसेच 5 हजार 500 रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली.
सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोख नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी या प्रकरणात महत्वाची भुमीका बजावत साक्षीदार यांना वेळोवेळी न्यायालयात हजर राहून प्रभावी साक्ष देतील यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विशेष प्रयत्न केले आहे. सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप चोपडा विभाग, तसेच श्री. सोनवणे यांनी केलेला असून तपासादरम्यान सखोल व प्रभावी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता के. आर. बागुल यांनी कामकाज पाहिले.


