जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्राळा परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरी गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. 7 जुलै 2026 रोजी रात्रीच्या सुमारास पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केटमधील एका पान मसाल्याचे दुकान अज्ञात चोरट्याने फोडले होते. दुकानातून विविध कंपन्यांचे सिगारेटचे 10 बॉक्स आणि नगदी 5 हजार रुपये असा एकूण 37 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणी तक्रारदार सुरेश नरवाडे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पथक आरोपींचा शोध घेत होते.
पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे आणि सुशिल चौधरी यांना मिळालेली गुप्त बातमी तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांची माहिती मिळवली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व त्यांच्या पथकाने पिंप्राळा परिसरात सापळा रचून सिद्धार्थ विनोद आढाळे (वय 19, रा. पिंप्राळा हुडको), दीपक भगवान सोनवणे (वय 20, रा. पिंप्राळा हुडको) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी सदर घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर दोन्ही आरोपींना दिनांक 22 जुलै 2026 रोजी रीतसर अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेला पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपासात पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सुधाकर अंभोरे, सुशिल चौधरी, अतुल चौधरी, सागर नन्नवरे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.


