
लोकशाही संपादकीय लेख
भुसावळ शहरासाठी तापी नदी भुसावळ लगत असताना ‘पाणी उशाला अन कोरड घशाला’ अशी अवस्था आहे. गेल्या आठ नऊ वर्षापासून भुसावळ शहराला दहा ते बारा दिवसानंतर पाणीपुरवठा होतो आहे. होणारा पाणीपुरवठा देखील शुद्ध न होता अशुद्ध होतो. आता उन्हाळ्यात तर भुसावळकरांचे पिण्याच्या पाण्यासाठी जे हाल होतील ते बघवत नाही. दहा ते बारा दिवसानंतर होणारा पाणी पुरवठा काही ठिकाणी फुल प्रेशरने न येता कमी दमाने होतो. अशावेळी नळांना मोटर लावल्याशिवाय पाणी चढत नाही. परंतु लाईट नसली की कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाणी पूर्ण क्षमतेने मिळण्याची शक्यता कमी असते. अशा वेळेला पाणी दहा दिवसांसाठी साठवून ठेवायचे असेल तर मोटारी शिवाय ते शक्य नसते. त्यामुळे बिचार्या भुसावळकरांचे हाल पहावत नाहीत. अशात अमृत योजना गेल्या नऊ वर्षापासून रखडली आहे. ती का रखडली आहे? याचे कारण मंत्री संजय सावकारे यांनाच माहीत! आता युद्ध पातळीवरून अमृत योजनेचे काम सुरू करायचे म्हटले तर त्यातही अडथळे येतात. अद्याप अमृत योजनेतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या व्हायच्या बाकी आहेत. पाईपलाईन टाकण्याचे काम तेवढे पूर्ण झाले आहे. अशा वेळी भुसावळकरांना 10 ते 12 दिवसानंतर पाणी मिळत असेल तर ती फार मोठी गैरसोय आहे. म्हणून पिण्याचे पाणी भुसावळकरांना पाच दिवसानंतर देण्यात यावे, अशी मागणी भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी पाणीपुरवठ्याच्या आढावा बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले की, “पाहतो काय करता येईल ते..!” परंतु दहा ते बारा दिवसानंतर पाणी देण्यात येणाऱ्या भुसावळला कमीत कमी पाच दिवसाला पाणी द्यायचे असेल तर जे पाणी दहा दिवसांसाठी चार तास देतात ते पाणी दोन तास जर पाच दिवसाला दिले तर पाण्याची बचत होईल आणि भुसावळकरांना पाणीही मिळेल. हा पालकमंत्र्यांचा तोडगा आहे. पण भुसावळ नगरपालिका आणि प्रशासन यांच्यात असलेला वादामुळे हे शक्य होईल का? किंवा पाच दिवसानंतर पाणी द्यायचे असेल तर रोटेशन शक्य आहे की नाही? हे प्रशासनालाच माहीत. परंतु नगराध्यक्ष गायत्री भंगाळे म्हणाल्या की पाणीपुरवठ्यामध्ये कोणी राजकारण करता कामा नये.. तसेच काही भागात दहा दिवसानंतर चार तास पाणीपुरवठा होतं तर काही भागांमध्ये सहा ते आठ तास पाणीपुरवठा होतो. असा दुजाभाव कशासाठी? नंतर मंत्री संजय सावकारे यांनी पाणीपुरवठ्याची सिस्टीम अशी असेल त्यात आपण काय करणार? ज्या तापी नदीतून आपण पाणी घेतो ते महावितरणच्या खात्याने त्यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातून घेतो. त्यांनी बांधलेल्या बंधार्यात आपण काही बदल करू शकत नाही. बंधाऱ्याची उंची वाढवण्याचे म्हटले तर महावितरणच्या परवानगी शिवाय ते करता येणार नाही. त्यामुळे कमी उंचीच्या बंधाऱ्यातून पाणी हे कमी प्रमाणात मिळते. तेव्हा आहे त्या पाणीपुरवठ्यातून आपण भुसावळकरांना पाणीपुरवठा करतो, असे संजय सावकारे यांचे म्हणणे आहे.
नगराध्यक्ष गायत्री भंगाळे म्हणतात की, नगरपालिकेला कुठलेही विकासाचे काम भाजपवाल्यांनी होऊ दिले नाही. त्यामुळे एखादा निर्णय घ्यायचा म्हटला की, त्याला विरोध होतो. त्यामुळे विकासाची कामे ही अडून पडली आहेत. आता तर त्यांनी माझ्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा काढून विरोध सुरू केला आहे. माझे आजोबा, पणजोबा वारले असताना ते उत्तर प्रदेशात जाऊन खोटे प्रमाणपत्र आणत आहेत. आणि ते सर्वांना दाखवत सुटले आहेत. याबाबत मंत्री संजय सावकारे यांनी म्हटले, की जात प्रमाणपत्र मी आणणारा कोण? त्यासाठी व्हिजिलन्स कमिटी असते. ती कमिटी सर्व बाबी तपासून घेऊन ठरवते की जात प्रमाणपत्र खरे की खोटे. यासंदर्भात नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी मंत्री संजय सावकारे आणि त्यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचे विरोधात अप्पर पोलीस अधिकारी यांच्याकडे एक निवेदन देऊन याबाबत आपण योग्य ती दखल घ्यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. नगराध्यक्ष पदाची सूत्रे घेऊन चार महिने झाली. परंतु एकही विकासाचे काम या मंडळींनी होऊ दिले नाही. प्रत्येक सर्वसाधारण सभेला विरोध होतो. त्यामुळे मोठ्या ठरावाला विरोध केला जातो. त्यात आतापर्यंत एकही विकासाचे काम झालेले नाही. 50 नगरसेवकांची संख्या असलेल्या नगरपालिकेत 27 नगरसेवक हे भाजपचे आहेत. शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन नगरसेवक आहेत. त्यामुळे एकूण संख्या ही विरोधातील 33 नगरसेवकांची होते. त्यामुळे बहुमत हे नेहमी विरोधकांकडे असल्याने नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी आणलेली ठराव मंजूर होत नाहीत. त्याला विरोध दर्शविला जातो. यासाठी मधला मार्ग काढायला हवा. पण विरोधक अडून बसले आहेत. मंत्री सावकारेही अडून बसले आहेत. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांकडून व्हायची ती कामे होत नाहीत आणि कात्रीत भुसावळ नगरपालिका सापडली आहे…!

