
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत माझ्यावर सीमा नाफडे या महिलेने केलेले सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीत माझ्या नावाचा साधा उल्लेख देखील केलेला नसतांना माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी हास्यास्पद असून आपण सदर महिलेवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी (शप) गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांनी पत्रपरिषदेत दिली.
ॲड. खडसे यांनी सांगितले की, पांडुरंग नाफडे नामक व्यक्ती माझ्याकडे 2023 पासून कामाला नाही, नाफडेचा तो कौटुंबिक विषय असल्याने त्यात माझा काडीचाही संबंध नसतांना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. सीमा नाफडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असतांनाही पोलिसांवर दबाव कसा? सीमा नाफडे हिने भुसावळ महिला केंद्रातही तक्रार दिली असून त्यांचे तेथे समुपदेशन देखील करण्यात आले आहे. श्रीमती नाफडेच्या फिर्यादीनुसार मुलीच्या भविष्यासाठी मी आजपर्यंत तक्रार दिली नाही असा उल्लेख असतांनाही त्यात आमचा काय संबंध असा प्रश्न ॲड. रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने सदर महिलेला मदत करण्याचे सोडून तिचा राजकीय वापर केल्याचा आरोपही ॲड. खडसे यांनी केला.
‘तो’ गुणवंत कोण?
बामणोद येथील गुणवंत निळ या व्यक्तीने सदर महिलेला खोटी माहिती देवून रुपाली चाकणकर यांच्या समोर बोलते केले आहे. सीमा नाफडेने माझ्याविरुद्ध आजपर्यंत कुठलीही तक्रार केलेली नसतांना चाकणकरांच्या उपस्थितीतच हे का घडले? याचा शोध घेतला पाहिजे. गुणवंत निळ हा चाकणकरांशी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कोपऱ्यात चर्चा करीत होता. चाकणकर त्याच्या घरीही जावून आल्याचा पुरावा आपल्याकडे असल्याचे ॲड. खडसे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार!
राष्ट्रवादी काँग्रेसची महिला प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी राज्यभरातील महिलांच्या समस्यांविरुद्ध रान उठवित असल्याने चाकणकरांच्या पायाखालची वाळू सरकरी असल्याने त्यांनी हा खोटा उद्योग सुरु केला आहे. त्यांना आयोगाच्या अध्यक्षपदावरुन हटवावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

