‘त्या ‘तीन मजुरांना चिरडणाऱ्या डंपर चालक तरुणाला अटक

0

‘त्या ‘तीन मजुरांना चिरडणाऱ्या डंपर चालक तरुणाला अटक

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची माहिती

जळगाव प्रतिनिधी ;- जळगाव खुर्द गावाजवळील महामार्गालगत सुरू असलेल्या सव्हींस रस्त्याच्या बांधकामस्थळी मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला. मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत तीन झोपलेल्या मजुरांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नशिराबाद पोलिसांनी संशयित चालक प्रकाशकुमार सुदामाप्रसाद पटेल (वय २४, रा. उफरवली, जि. सिंधी, मध्यप्रदेश) याला अटक केली.अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

जळगाव खुर्दजवळील उड्डाणपुलाशेजारी सव्हींस रस्त्याचे काम सुरू आहे. येथे परप्रांतीय मजूर काम करत होते. सोमवारी रात्री उशिरा नाल्याच्या बांधकामानंतर काही मजूर तिथेच झोपले. पहाटेच्या सुमारास मुरुम वाहतूक करणाऱ्या एका डंपरने त्यांना चिरडले. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावर न थांबता पसार झाला.

या घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मजूरांना चिरडणारे वाहन कोणते हे स्पष्ट नव्हते. मात्र, सव्हींस रोड पुढे बंद असल्याने केवळ मुरुम वाहून आणणाऱ्या डंपरचाच यात सहभाग असू शकतो, असा पोलिसांचा संशय होता.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मुरुम वाहतूक करणाऱ्या तिघा डंपर चालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपींनी काहीही माहिती नसल्याचा दावा केला. मात्र, कसून चौकशीत प्रकाशकुमार पटेल याने डंपर रिव्हर्स घेत असताना झोपलेल्या मजुरांना चिरडल्याची कबुली दिली.

आरोपी चालकाला रात्री उशिरा अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, बांधकाम मजुरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.