‘द बर्निंग ट्रक’चा थरार.. फटाक्यांचा ट्रक जळून खाक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

टेंभुर्णी : बुधवारी पहाटे टेंभुर्णी. पुणे-सोलापूर महामार्गावर भल्या पहाटे शोभेची दारू वाहतूक करणारा माल ट्रक पेटल्याने ‘द बर्निंग ट्रक’चा थरार पहावयास मिळाला. हा मालट्रक जळून लाखो रुपयांच्या फटाक्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, अद्यापपर्यंत याबाबत फिर्याद देण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. ही घटना आज (बुधवारी) पहाटे ३.३० च्या सुमारास महामार्गावरील आकुंभे (ता. माढा) गावाच्या शिवारात घडली.

बुधवारी पहाटे टेंभुर्णी पोलिसांना पुणे-सोलापूर महामार्गावर आकुंभे शिवारात मालट्रक पेटला असल्याचे समजताच अपघात पथकाचे ए. एस. आय अभिमान गुटाळ, चालक क्षीरसागर हे घटनास्थळी दाखल झाले. मात्र, मालट्रक संपूर्ण आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. आग लागल्याचे समजताच चालकाने ट्रक बाजूला घेऊन उभा केला. मालट्रकमध्ये फटाके (शोभेची दारू) असल्याने सतत फटाक्यांचे स्फोट होत असल्याने कोणालाही जवळ जाता येत नव्हते.

मोठ्या आवाजाने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. ही आग लागल्यावर पोलिसांनी सुरक्षितपणे वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळविली. अग्निशमन बंब उपलब्ध झाला नसल्याने पोलिसांनी वरवडे टोल प्लाझा येथील पाण्याच्या टँकर मागवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण त्याचाही उपयोग झाला नाही.

ही आग विझविण्यासाठी महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस कर्मचारी यांनीही प्रयत्न केले. या मालट्रकमधील माल कोठून आला व तो कोठे निघाला होता. हे अद्याप समजू शकलेले नाही. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास ए.एस.आय अभिमान गुटाळ हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.