सिमेंट मिक्सरची रिक्षाला भीषण धडक; मायलेकीसह तिघे ठार

0

सिमेंट मिक्सरची रिक्षाला भीषण धडक; मायलेकीसह तिघे ठार

गंगापुरी–गारखेडे रस्त्यावर घडली घटना; पाच प्रवासी जखमी

जामनेर (प्रतिनिधी) : भुसावळहून जामनेरकडे येणाऱ्या प्रवासी रिक्षाला समोरून भरधाव येणाऱ्या सिमेंट मिक्सर वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मायलेकीसह तिघांचा जागीच व उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. ही हृदयद्रावक घटना शनिवारी (दि. १३) सायंकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील गंगापुरी ते गारखेडे दरम्यान घडली. या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिक्सर ट्रक (क्र. एमएच १९-सीएक्स-२१८१) ने पियाजो प्रवासी रिक्षा (क्र. एमएच १९-व्ही-३७०४) ला समोरासमोर जबर धडक दिली. अपघाताच्या वेळी रिक्षामध्ये एकूण आठ प्रवासी होते. या धडकेत सरला गोपाळ निंबाळकर (४२) व त्यांची मुलगी निकिता गोपाळ निंबाळकर (२०, दोघी रा. चिंचखेडे बुद्रूक, ता. जामनेर) तसेच प्रमोद श्रीराम गुरुभैया (३२, रा. तळेगाव, ता. जामनेर) यांचा मृत्यू झाला.

अपघातात जयेश निंबाळकर (१६), सरला गोपाळ निंबाळकर (३९, रा. चिंचखेडा), योगेश विठ्ठल गायकवाड (४५, रिक्षाचालक, रा. विवेकानंद नगर, जामनेर), सुरेश कापडे (५०), संगीता सुभाष चौधरी (५०, दोघे रा. छत्रपती संभाजीनगर) तसेच अखिलेश कुमार (५०, रा. उत्तर प्रदेश) हे जखमी झाले. जखमींना तातडीने जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. मात्र जळगावकडे नेत असताना सरला गोपाळ निंबाळकर (३९) यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.

दरम्यान, जामनेर–पहूर मार्गावर मागील महिन्यात दुचाकी व पिकअपच्या अपघातात चार तरुणांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एक भीषण अपघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मृत निकिता निंबाळकर हिचे येत्या २३ जानेवारी रोजी लग्न ठरले होते. सुखी संसाराची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या निकितावर नियतीने घाला घातल्याने चिंचखेडे परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.