लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरो पिकअप वाहनाला पाचोराकडून जाणाऱ्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्याची घटना 11 ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली. या अपघातात एकूण 12 भाविक जखमी झाले असून, त्यापैकी सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. उर्वरित सहा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील बंजारा समाजातील भाविक सिन्नर तालुक्यातील वडांगडी येथे गेले होते. तेथून परतताना पाचोरा ते भडगाव दरम्यान ही दुर्घटना घडली.
देवदर्शनाहून बोलेरो कारमधून भाविक गावी परतत असताना पाचोरा ते वडगाव रस्त्यावर अपघाताची भीषण दुर्घटना घडली. या अपघातातील जखमींमध्ये संजय पवार (50), अविनाश पवार (24), सुनील राठोड (27), सुपडुबाई ईश्वर पवार (40), उज्ज्वलाबाई सुनील राठोड (22) आणि मिराबाई सरिचंद राठोड (60) यांचा समावेश आहे. एकूण 12 भाविक या वाहनातून प्रवास करत होते. अपघातानंतर जखमींना तातडीने भडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. पंकज जाधव यांनी प्रथमोपचार केले, त्यानंतर पुढील उपचारासाठी सर्व जखमींना पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये डॉ. सागर गरुड यांनी जखमींवर उपचार केले. दरम्यान, काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी देखील रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली, तसेच त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. अपघातातील जखमींवर सध्या उपचार सुरू असून, अपघात नेमका कसा घडला याबाबत पुढील तपास सुरू आहे.


