म्हसवे फाट्याजवळ भीषण अपघात

0

म्हसवे फाट्याजवळ भीषण अपघात
ट्रकच्या धडकेत पत्नी ठार, पती गंभीर जखमी

पारोळा (प्रतिनिधी): येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील बायपासवर म्हसवे फाट्याजवळ ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या अपघातात रूपाली शुभम बोरसे (वय २१) असे मृत विवाहितेचे नाव आहे, तर शुभम भाऊसाहेब बोरसे (वय २५) हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ रोजी दुपारी सुमारे १ वाजता शुभम व रूपाली बोरसे हे दांपत्य दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीके ६२५२) ने जळगावकडे जात होते. यावेळी महामार्गावरील बायपासवर म्हसवे फाट्याजवळ रस्ता ओलांडत असताना ट्रक क्रमांक (एचआर ५८ एफ १३१३) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

या धडकेत रूपाली बोरसे यांच्या डोक्याला, तोंडाला व कमरेला गंभीर इजा झाली, तर शुभम बोरसे यांच्या पायाला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर रुग्णवाहिका चालक आशुतोष शेलार यांनी दोघांनाही तातडीने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर रूपाली बोरसे यांना मृत घोषित केले. शुभम बोरसे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक पवार, हवालदार डॉ. शरद पाटील व मिथुन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी पुरुषोत्तम बोरसे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात ट्रक चालक वसीम इरफान राजपूत (रा. चौरादेव, ता. जि. सहारनपूर, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डॉ. शरद पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.