वाळू घेऊन परतणारे ट्रॅक्टर पलटी; २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

पिंपरीनांदू शिवारातील घटना ; दुसरा तरुण गंभीर

0

वाळू घेऊन परतणारे ट्रॅक्टर पलटी; २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

पिंपरीनांदू शिवारातील घटना ; दुसरा तरुण गंभीर

मुक्ताईनगर – तापी नदीकाठावरून वाळू घेऊन गावाकडे परत येत असताना झालेल्या भीषण अपघातात एका २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. २० ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजता मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरीनांदू शिवारात घडली असून, गावावर शोककळा पसरली आहे.

या दुर्घटनेत तोहीत शाह इस्माईल शाह (वय २१, रा. पिंपरीनांदू) या तरुणाचा मृत्यू झाला. तोहीत रोजंदारीवर मजुरीचे काम करत होता. सोमवारी सकाळी तो वाळू भरण्यासाठी नदीकाठावर गेला होता. वाळू भरून गावाकडे परतत असताना शेतातील रस्त्यावर आयशर ४८५ ट्रॅक्टर आणि ट्रॉली अचानक पलटी झाली. ट्रॉलीखाली दबल्याने तोहीत याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात सोबत असलेला अनिकेत संदीप इंगळे हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याच्या पायाला जबर मार लागल्याचे सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ट्रॅक्टर सरळ करून तोहीतला बाहेर काढले. मात्र, रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

फिर्यादी सलीम शाह करीम शाह (वय ३९) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रॅक्टर आणि ट्रॉली दोन्ही विना क्रमांक (बिननंबर) होते. अनधिकृत वाळू वाहतूक आणि विना नंबरचे वाहन असल्यामुळे अपघाताची तीव्रता वाढल्याचे बोलले जात आहे.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पो.हे.का. लीलाधर भोई पुढील तपास करीत आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.