धान्याने भरलेला ट्रक रेल्वेला धडकला ; मोठी दुर्घटना टळली !

बोदवड प्रतिनिधी
राज्यभर धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास मुंबई-अमरावती एक्सप्रेसला (गाडी क्रमांक 12111) अपघात झाला. या दुर्घटनेत मोठा अनर्थ टळला असला तरी रेल्वे इंजिनाचे मोठे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, नाडगाव येथील बंद असलेल्या रेल्वे क्रॉसिंगमधून धान्याने भरलेला ट्रक अचानक नियंत्रण सुटून रेल्वे ट्रॅकवर आला. त्याच वेळी, मुंबई-अमरावती एक्सप्रेस बोदवड रेल्वे स्थानकाजवळून जात असताना हा ट्रक थेट रेल्वे इंजिनावर धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रकचे तुकडे-तुकडे झाले.
अपघात होताच रेल्वे चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने ब्रेक लावले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिक आणि रेल्वे प्रशासनाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेने वाहतूक सुरळीत करण्यासाठी तत्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत.
या अपघातामुळे काही काळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने तातडीने कामगिरी करत मार्ग मोकळा केला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळ उडाला होता. दरम्यान, ट्रक चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
रेल्वे विभागाकडून या अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक दक्षता घेतली जाईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


