नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
नाशिकमधील चांदवडजवळ भरधाव कारने कंटेनरला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. यात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून यात एका नगरसेवकाचा देखील समावेश आहे.

मुंबईकडून धुळे येथे जात असताना नाशिकमधील केदराई फाटा येथे नमोकार तीर्थासमोर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने धडक दिली. मुंबई-आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. सर्व मृत प्रवासी हे धुळ्यातील रहिवासी असून अपघातामध्ये किरण हरिश्चंद्र अहिरराव हे धुळ्याचे नगरसेवक देखील मृत्युमुखी पडले. किरण अहिरराव हे नाशिकच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांचे भाऊ असल्याचे समजते. इतर मृतांची अद्याप ओळख होऊ शकलेली नाही. अपघात घडल्यानंतर सोमा टोल वेज कंपनीचे पथक आणि पोलिस अपघातस्थळी दाखल झाले. या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता.


